सर्वोच्च न्यायालयाने विलंबाबत कानउघाडणी केल्यानंतर आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज, सोमवारपासून सुनावणी सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी सुनावणीचं प्रारूप आणि रूपरेषा स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे याही अपात्र व्हायला पाहिजेत, अशी मागणी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांनी केली आहे. ते 'टीव्ही ९ मराठी'शी बोलत होते. अनिल परब म्हणाले, "नीलम गोऱ्हेंविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे अपात्र व्हायला पाहिजेत. कारण, जो नियम बाकी आमदारांना लागू होतो, तोच नियम गोऱ्हेंनाही लागू होणार आहे." हेही वाचा : “पवारांची साथ सोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांच्या ऑफर्स, भाजपाकडून तर…”, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट "विधानपरिषद सभापतींची जागा रिक्त असल्यानं उपसभापतींकडे सर्व कारभार असतो. उपसभापतींवर अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असल्यानं त्यांची सुनावणी कोण घेणार? तातडीनं सभापतींची निवड घ्यावी लागेल. तसेच, उपसभापतींवर अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असल्यानं अन्य आमदारांची सुनावणी त्यांनी घेऊ नये," असेही अनिल परब यांनी म्हटलं. हेही वाचा : “…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान दरम्यान, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका प्रलंबित असताना त्यांना अन्य आमदारांविरोधात अपात्रता याचिकांवर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे का? हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीत उपस्थित होण्याची शक्यता आहे.