Anil Patil On Sunetra Pawar Deputy CM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या असून त्यांची थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची एवढी घाई का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. या अनुषंगाने पत्रकारांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते अनिल पाटील यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना अनिल पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘आपल्याला या गोष्टी घाईच्या वाटत असल्या तरी ती काळाची गरज आहे’, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
अनिल पाटील काय म्हणाले?
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी एवढी घाई का? एवढ्या घाईने शपथविधी का करण्यात येत आहे? यामागचं कारण काय? असा पत्रकारांनी विचारलं. यावर अनिल पाटील म्हणाले की, “आपल्या या सर्व गोष्टी जरी घाईच्या वाटत असल्या तरी ती काळाची गरज आहे. मग ती मजबुरीने का असेना. पण हीच काळाची गरज आहे. राष्ट्रवादीचा गटनेता निवडणं हे काम राष्ट्रवादीचे आमदारच करू शकतात. त्यामुळे पक्षाच्या सर्व आमदारांच्या भावना लक्षात घेतल्या असता हा निर्णय घेणं भाग पडत आहे”, असं अनिल पाटील यांनी सांगितलं.
सुनेत्रा पवार मुंबईत दाखल, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
सुनेत्रा पवार या लवकरच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या असून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांनी काय म्हटलं?
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा मी ऐकतोय, त्या मुंबईत सुरू आहेत, मी येथे (बारामतीत) आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. आता प्राधान्याने काय करावं? हे त्यांनी ठरवलेलं दिसत आहे. त्यांच्या आधी-मधी मी भाष्य करणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

