Anjali Bharti Statment on Amurta Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कव्वाली गायिका अंजली भारती यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, माझ्याकडून चुकून त्या शब्दाचा वापर झाला असून मला टार्गेट करण्यात आलं असल्याचंही त्या म्हणाल्या. मी आंबेडकरी समाजाची असून दलितांचा आवाज दाबण्यासाठी मला टार्गेट करण्यात आलं असं अंजली भारती म्हणाल्या.
गृहमंत्र्यांचं लक्ष वेधायचं होतं
अंजली भारती म्हणाल्या, एका कार्यक्रमातील माझे व्हिडिओ व्हायरल झाले असून भाजपाचे रोजंदारीवर ठेवलेले काही कार्यकर्ते टिप्पणी करत होते. काही महिलाही माझ्यावर टीका टिप्पणी करत होते. मी भीम मेळाव्यात महिलांची बाजू मांडत असताना एससी, एसटी, ओबीसी नव्हे तर सर्व मायबहिणींची बाजू मांडत होते. प्रत्येक जातीच्या महिलेवर अन्याय अत्याचार, बलात्कार होत आहेत, यावर मी बोलत होते. लहान मुलीही अत्याचारातून सुटत नाहीत. त्यामुळे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांचं मला लक्ष वेधायचं होतं.”
बोलण्याच्या ओघात चुकून शब्द आले
“मला सांगायचं होतं की, कायदे अपुरे पडत आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी ठोस कायदा किंवा फाशीची तरतूद करावी. तुमच्या हातात कायदा असताना तुम्ही लक्ष का देत नाही. तुम्ही महिलांवर, बालिकांवर अत्याचार होत असताना तुम्हाला डोळ्यांनी पाहायचं आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसंच, ही बाजू मांडत असताना बोलण्याच्या ओघात देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबाबत चुकून तोंडून शब्द निघाला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली. मी महिलांचा सन्मान करते. फुले, शाहू आंबेडकरांचे माझ्यावर संस्कार आहेत, असंही त्या पुढे म्हणाल्या.
भाजपाकडून टार्गेट केलं गेलं
दरम्यान, त्यांनी भाजपावरही टीका केली. “मी आंबेडकरी समाजाची असल्याने दलिताचा आवाज दाबण्यासाठी यांनी मला टार्गेट करण्याचं काम केलंय. भाजपाच्या कित्येक कार्यकर्त्यांनी धमकी दिली. त्यामुळे माझा फोन स्विचऑफ करून ठेवलाय.पण यांना एवढीच तळमळ असेल तर जे अन्याय अत्याचार करतात त्यांच्यावर कारवाई करा, मी फक्त बोलले तर माझ्यावर सर्वांनी टीका करायला सुरुवात केली”, असंही त्या म्हणाल्या.

