मामेभावाच्या कल्याणासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील चार पाटबंधारे महामंडळातील एक हजार कोटींची कामे त्यांना दिल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या पाठपुराव्यामुळे ही माहिती उघड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सिंचन प्रकल्पांची ही कंत्राटे देण्यामध्ये अनेक अनियमितता असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चार पाटबंधारे महामंडळातील २० सिंचन प्रकल्पांची कामे ‘राज ग्रुप ऑफ कंपनी’ला देण्यात आली आहेत. या कंपनीचे मालक जगदीश कदम आणि राम निंबाळकर असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. जगदीश कदम हा अजित पवार यांच्या मामाचा मुलगा असल्याचेही त्या म्हणाल्या. केवळ यांना कंत्राटे मिळवून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची निर्मिती केली गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, आष्टी तालुक्यात एका उर्ध्व जलसिंचन प्रकल्पाचे काम होती घेण्यासाठी भूसंपादन करण्यात आले. वास्तविक हा दुष्काळी भाग असल्याने तिथे पाऊस कमी पडतो. मग या प्रकल्पासाठी पाणी कुठून येणार, याचा शोध घेण्यास स्थानिक शेतकऱयाने सुरुवात केली. तेव्हा त्याला उजनी धरणातून २९५ किलोमीटरवरून पाणी आणण्यात येणार असल्याचे सांगितले. हे पाणी आणण्यासाठी पाईपलाईन किंवा कालवे बांधण्याचे काम केले गेले नसतानाच ४८०० कोटींची कंत्राटे कशासाठी देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या कंत्राटांबद्दल आम्हाला माहिती मिळवल्यावर ‘राज ग्रुप ऑफ कंपनी’ची वेबसाईट गुरुवारी रात्रीपासून बंद करण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.