Anjali Damania Challenges Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया व अजित पवार गटातील सूरज चव्हाण व अमोल मिटकरी यांच्यात 'एक्स'वर रंगलेला कलगीतुरा अद्याप चालू आहे. एकीकडे अंजली दमानिया यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं असताना दुसरीकडे सूरज चव्हाण व अमोल मिटकरी हे अंजली दमानियांच्या आरोपांना उत्तर देत आहेत. यामध्ये आता अंजली दमानिया यांनी अजित पवारांना आव्हान देणारी पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. त्यात त्यांचे ३ वर्षांचे आयटीआर रिटर्न्स अर्थात प्राप्तीकर परतावा भरल्याचे पुरावे आणण्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. "फक्त गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी…" दोन दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या गुलाबी बसमधील फोटोवर खोचक पोस्ट केली होती. "गुलाबी जॅकेट घालून गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून जनसन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या कराचा अपव्यय न करणे, भ्रष्टाचार न करणे हा जनतेचा खरा सन्मान होईल. तो तुमच्यानं या जन्मी तरी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो", अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. "डुकराशी कुस्ती करायची नसते" यावर टीका करणाऱ्या सूरज चव्हाण यांनाही अंजली दमानिया यांनी लक्ष्य केलं. "मिस्टर सूरज चव्हाण. तुम्ही आणि तुमचे मालक अजित पवार काय आहात ते उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि मी किती तत्त्वावर जगते ते देखील पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे… आणि हो, तुमच्या मालकाला देखील माहित आहे, त्यांना विचारा. दोष तुमचा नाही, तुमच्या भ्रष्ट विचारसरणीचा आहे. तत्त्वावर लोक कशी जगतात ते तुम्हाला कळणे शक्य नाही. तुमच्याबद्दल मी बोलणार नाही कारण इंग्रजीतली एक म्हण आठवली. कधीही डुकराशी कुस्ती करायची नसते. त्यामुळे तुम्ही दोघं चिखलानं माखता आणि डुकराला त्यात आनंद मिळत असतो, असा त्याचा अर्थ आहे", असं अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. सूरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर दरम्यान, अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी यावर अंजली दमानिया यांचा एकेरी उल्लेख करत प्रत्युत्तर दिलं आहे. "अंजली दमानिया रीचार्जवर चालणारी बाई आहे", असं ते म्हणाले. "अंजली दमानियांचं उत्पन्न काय ते त्यांनी सांगावं. वर्षातून दोन विदेशी सहली कशा होतात? ८ तारखेला ईडीमध्ये त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्या गोरगरीब जनतेची जमीन बिल्डरच्या घशात घालतात. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत", असा आरोप सूरज चव्हाण यांनी केला आहे. Amol Mitkari : “वाघांनी सुपारीबहाद्दराला महाराष्ट्राच्या मातीची धग दाखवली”, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका "अंजली दमानियांच्या मागे आमचे मित्र, आमचे शत्रू आहेत. आम्हालाही ते कोण आहेत ते माहिती आहे. अंजली दमानियांना शेवटचा इशारा देतोय. यापुढे जर राष्ट्रवादी किंवा पक्षाच्या नेत्याच्या नादाला लागल्या, तर त्यांच्या आख्ख्या कुटुंबाची मालमत्ता, कुठे कुठे काय काय कमवून ठेवलंय ते सगळं बाहेर काढेन. ज्या हॉटेलमध्ये ती अगरवाल नावाच्या वकिलाच्या माध्यमातून मॅनेज झाली, तो व्हिडीओही मी बाहेर काढेन. अंजली दमानिया ब्लॅकमेलर आहे", अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली. अंजली दमानियांचं अजित पवारांना आव्हान दरम्यान, अंजली दमानियांनी आता यावरून थेट अजित पवारांना आव्हान दिलं आहे. "अजित पवारांना माझं आव्हान आहे. १७ तारखेला मी मुंबईा परत येत आहे. माझा पासपोर्ट, ३ वर्षांच्या प्राप्तीकर परताव्याच्या प्रती घेऊन येते. अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावेत. होऊन जाऊ दे". चव्हाण-मिटकरी… तुमच्या मालकांना निरोप सांगा", असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.