मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर कोसळलेल्या दरडीच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलंच वादळ उठलं आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना “१ कोटी खोटारडे मेल्यानंतर हे पैदा झाले” आणि “भाड्याचे टट्टू” अशा अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला होता.
फडणवीसांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता विरोधकांनीही “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही!” असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केला आहे. याच वादावर आता प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अत्यंत महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या दुरवस्थेवरून अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी या प्रकल्पाची दुर्दशा पाहत असताना, सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र फक्त आणि फक्त अहंकार ठासून भरला आहे,” अशा शब्दांत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘भाडे के टट्टू’ म्हणणं मुख्यमंत्र्यांना शोभतं का?
प्रकल्पातील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या विरोधक किंवा टीकाकारांना मुख्यमंत्र्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. “मिसिंग लिंकची दुरवस्था समोर आलेली असताना, प्रश्न विचारणाऱ्या सगळ्यांना ‘भाडे के टट्टू’ (भाडोत्री लोक) म्हणणं एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभतं का?” असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अशी भाषा वापरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘देख लेंगे’ची भाषा; फडणवीसांवर निशाणा
अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदललेल्या भूमिकेवरही आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “प्रत्येक प्रकल्पामध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना जर कोणी आवाज उठवला, तर मुख्यमंत्री ‘देख लूंगा’ (पाहून घेईन) अशी भाषा वापरतात.
हेच देवेंद्र फडणवीस कोणे एके काळी विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराचे मोठे मुद्दे अधिवेशनात आक्रमकपणे मांडायचे. पण आज सत्ता मिळाल्यावर तेही ‘देख लूंगा’ म्हणत आहेत. हा ‘१८० अंशाचा’ (१८० डिग्री) बदल आहे.” अशा शब्दांत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला.
