Anjali Damania on Dhananjay Munde Meeting with Amit Shah in delhi : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी अचानक दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालायाने अटक वॉरंट जारी झाल्यानंतर मुंडेंनी शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात कोकाटेंचे मंत्रीपद गेल्यावर ते धनंजय मुंडेंना मिळणार का? अशी चर्चा होत आहे. यादरम्यान समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत तीव्र टीका केली आहे. दामानिया यांनी अमित शाह यांनी धनंजय मुंडे यांना भेटीसाठी वेळ दिला यावर देखील आक्षेप घेतला आहे.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अमित शाह यांच्या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे. असे असले तरी अंजली दमानिया यांनी यावरून टीका केली आहे. अमित शाह मला भेटीसाठी वेळ देत नाहीत पण धनंजय मुंडे, अजित पवार इत्यादी नेत्यांना वेळ देतात. यातून काय समजून घ्यायचे ते घ्या असे दमानिया म्हणाल्या आहेत.

अंजली दमानियांची पोस्ट काय?

अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शाह , मला, म्हणजे भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. ह्यात काय ते समजून जा…भाजपाला काय बोलू…… शब्दच उरले नाहीत

ज्या धनंजय मुंडेंवर

१) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत
२) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत
३) Mahagenco मधून राख चोरल्याचे आरोप आहेत
४) आवदा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे आरोप आहेत
५) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत
६) दहशत, बंदुकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत

आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे, ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मिक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर ह्या भाजपाचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे. जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी ह्या जन्मी त्यांना माफ करणार नाही.”

अमित शाहांच्या भेटीचा उद्देश काय?

धनंजय मुंडेनी अमित शाह यांची भेट ही पूर्वनियोजित होती असे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. या भेटीचे कारण स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमित भाई शाह यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती.”