Anjali Damania On Nawab Malik : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडी होत आहेत.
या अनुषंगानेच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे, तर मुंबईत वंचित आघाडी आणि काँग्रेसने युती केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र, मुंबईत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सूत जुळलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
या सर्व घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘भाजपाला नवाब मलिकांची राष्ट्रवादी विधानसभेत चालते, पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चालत नाही? काय अजब राजकारण आहे’, असं म्हणत अंजली दमानिया यांनी टीका केली आहे.
अंजली दमानिया यांनी काय म्हटलं?
“महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास म्हणता, मग दोन्ही राष्ट्रवादी फक्त पिंपरी–चिंचवडपुरतेच एकत्र का? संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्याची हिम्मत, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा नाही का? की विकास, विचारसरणी आणि तत्त्वे सत्तेच्या गणितापुढे गहाण टाकली आहेत? भाजपाला नवाब मलिक असलेला अजित पवार गट विधानसभेत चालतो, पण मुंबईत चालत नाही? काय अजब राजकारण चालू आहे?”, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईसाठी पहिली यादी जाहीर
मु्ंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सूत जुळलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी संध्याकाळी मुंबई महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये एकूण ३७ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या नवाब मलिकांना भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध होता, त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
नवाब मलिकांच्या कुटुंबात तिघांना उमेदवारी
“२०१७ ला १६५ मधून मी उमेदवार होते. माझ्या आत्या सईदा खान व माझे काका कप्तान मलिक हेही उमेदवार होते. आता त्या दोघांची उमेदवारी पुन्हा दिली जात असून कप्तान यांच्या सून बुशरा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे”, अशी माहिती नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली आहे. “मुंबईत स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात आमच्याशी बोलणं झालं आहे. पण त्यासंदर्भात अंतिम निर्णय झाल्यास आमच्या कुटुंबातून हे तिघे मुंबई महानगर पालिका निवडणूक लढवतील”,असंही त्यांनी नमूद केलं.
बावनकुळे म्हणतात, भाजपाचा मलिकांना विरोध नाही!
नवाब मलिक यांच्यामुळेच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी युती होऊ शकलेली नसल्याचं स्पष्ट झालं होतं. भाजपाच्या काही नेत्यांनी जाहीरपणे नवाब मलिक यांच्या मुंबईतील नेतृत्वाला विरोधही केला होता. मात्र, आता भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवाब मलिकांच्या नेतृत्वाला भाजपाचा विरोध नसल्याचं ‘लोकसत्ता’शी बोलताना नमूद केलं आहे. “नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, पण ते सिद्ध झाले नाहीत. मुंबईत राष्ट्रवादीशी युती करायची नाही हे पूर्वीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले आहे”, असं बावनकुळे यांनी म्हटलं.
