Anjali Damania On Sunil Tatkare : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. मात्र, याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या संदर्भातील प्रश्न पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारला होता. मात्र, त्यानंतर सुनील तटकरे यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. यावेळी ते काहीसे संतापल्याचेही पाहायला मिळाले. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट शेअर करत सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. ‘चाकणकरांबद्दल प्रश्न विचारताच पळ का काढला? तटकरेजी आज तुमची ‘त त प प’ स्पष्ट दिसलं’, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

“रूपाली चाकणकरांबद्दल प्रश्न विचारताच सुनील तटकरे यांनी पळ काढला. काय लपवायचं आहे असं समजायचं? तटकरेजी, आज तुमची ‘त त प प’ स्पष्ट दिसली. आता मात्र ही बाब इथे थांबणार नाही, ह्या बाईंना वाचवणं कुणालाच शक्य होणार नाही. यावेळी ना त्या सुटणार, ना तुम्ही, आणि हो बाबासाहेबांचे नाव तुमच्या तोंडी शोभत नाही”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचा प्रश्न अन् तटकरेंचं एका वाक्यात उत्तर

अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यावरून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. याबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. तटकरे म्हणाले की, “मी योग्यवेळी त्यावर बोलेन. मला बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे. त्यामुळे मला ज्यावेळी जेवढं बोलायचं तेवढंच मी बोलेन. मला जेव्हा त्या विषयावर बोलायचं तेव्हा नक्कीच बोलेन”, असं सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

अशोक खरातप्रकरणी सुनील तटकरेंनी पोस्ट करत काय म्हटलं?

“नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू”, असं सुनील तटकरे यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.