अजित पवारांविरोधात जीवापाड लढले पण हे खूप चुकीचं घडलं अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘डोकं खूप सुन्न झालं आहे. विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जीवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे… हे इतकं धक्कादायक की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे…. खूप’, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजितदादांच्या आकस्मिक मृत्यूबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. विमान एवढा भीषण होता की विमान जळून खाक झालं. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती. यासाठी अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. बारामतीतच दादांचा मृत्यू व्हावा हा विचित्र योगायोग आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.