सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या पाया पडतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोबाबत त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे. चंद्रकांत पाटील हे राज्याचे माजी मंत्री आहेत. तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी किमान अशा माणसाच्या पाया पडण्याआधी स्वतःच्या वयाचा विचार करायला हवा होता असंही दमानियांनी म्हटलं आहे.

काय आहे अंजली दमानियांची पोस्ट?

हे आपले माजी मंत्री चंद्रकांत पाटील.

भाजप चे वरिष्ठ नेते…. साहेब, अशोक खरात यांच्यापुढे वाकत आहेत.

निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं

जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल, तर देवाच देश वाचवो.

अंजली दमानियांनी याआधीही आरोप केले आहेत

अंजली दमानियांनी अशोक खरातवर आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. अशोक खरात प्रकरणी त्यांनी अनेकदा व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. तसंच रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांनी कसे फोन कॉल्स केले होते ते देखील त्यांनी सांगितलं होतं.

Ashok Kharat financial fraud case investigation Sinnar | Jagadamba Pat Sanstha fake account scam Nashik | अशोक खरात आर्थिक फसवणूक सिन्नर | जगदंबा पतसंस्था बनावट खाते घोटाळा
५७ लाखांच्या फसवणूक प्रकरणी अशोक खरातवर गुन्हा

एप्रिल महिन्यात काय म्हटलं होतं अंजली दमानियांनी?

“नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्नरमधील पराभूत उमेदवार उदय सांगळे, विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, दादा भुसेंचे पीए रामदास खेडकर, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे आणि शरद पवार पक्षाचे जयंत पाटील हे सगळे अशोक खरातच्या संपर्कात होते” असा आरोप अंजली दमानियांनी केला होता.

मार्च महिन्यात अंजली दमानियांनी काय आरोप केले होते?

  • अशोक खरात ओश्नो जल बनवायचा. एक कफ सिरप होतं, त्यात पाणी घालायचे, कुटून व्हायग्रा घालायचे. हे घेण्यासाठी अनेक राजकारणी आहेत, सगळ्या पक्षातली माणसं आहेत जी ओश्नो जल घेण्यासाठी कार पाठवत असत.
  • ओश्नो जल दिल्यानंतर अशोक खरात काय करायचा? दोन प्रकारची सो कॉल्ड साधना करायचा. ओश्नो प्रे अशी पहिली साधना होती त्यात ओम ईशान्येश्वराय नम: असा जप ११ वेळा करायचा असं सांगायचा. त्यानंतर शंकराच्या पिंडीवर असलेला हंडा हलायला लागयचा त्यानंतर जो प्रश्न विचारला जाईल हंडा थांबला की त्या प्रश्नाचं उत्तर असायचं महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार यादिवशी करायला सांगायचा. यातला दुसरा प्रकार होता सिद्ध प्रेअर.
  • सिद्ध प्रेअरमध्ये होम हवन केलं जायचं. कुणाला सापाचा आवाज यायचा, कुणाला वेगळे वेगळे आवाज यायजे. एक प्रकारचं संमोहन केलं जायचं. शेकडो बायकांचं अशोक खरातने लैंगिक शोषण केलं. ओश्नो जल देऊन पैसे उकळायचे हे प्रकार अशोक खरात करायचा.
  • साई सिल्व्हर नावाचं एक मंगल कार्यालय शिर्डीला आहे. त्यांच्याकडूनही अशोक खरातने हडपलं आहे. अशोक खरातने त्यांना पैसे दिले होते जे त्यांना परत करता आले नाहीत म्हणून हे केलं.
Anjali Damania explaining Ashok Kharat CDR data and verification process
अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांचे कॉल रेकॉर्ड कसे मिळवले (फोटो-अंजली दमानिया, ट्वीटर पेज)

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ जप्त

भोंदू बाबा अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. महिलांचं शोषण केल्याचं हे भयंकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अशोक खरातचे ५८ व्हिडीओ पोलिसांनी जप्त केले आहेत. या व्हिडीओत काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी यांचाही समावेश आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भविष्य जाणून घेण्यासाठी नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. अशोक खरातचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भोंदूबाबाचे पाय धुताना दिसत आहेत. यावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला.

अशोक खरात मूळचा सिन्नरचा, नाशिकमध्ये बसवलं बस्तान

६७ वर्षीय अशोक खरात हा मूळचा सिन्नरचा आहे. शालेय शिक्षणानंतर तो गायब झाला. त्यानंतर अचानक नाशिकमध्ये येऊन त्याने बस्तान बसवलं. मर्चंट नेव्हीत कॅप्टन असल्याचं तो सुरुवातीला सांगत होता. त्यामुळेच त्याला ‘कॅप्टन’ असं संबोधलं जातं. अशोक खरातला अटक करण्यात आली. अशोक खरातने १५४ देशांमध्ये प्रवास केलाय. त्यामुळे त्याला अनेक देशांच्या भाषा बोलता येतात. तसंच अनेक देशांमधल्या चालीरिती आणि धार्मिक परंपरा याचीही त्याला जाण आहे. २२ वर्षे नेव्हीमध्ये नोकरी करताना आपण १५४ देश फिरल्याचं त्याने सांगितलं होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

अशोक खरातने आर्थिक शोषणही केल्याची माहिती समोर

खरातने केवळ शारीरिकच नव्हे तर आर्थिक शोषणही मोठ्या प्रमाणावर केले. त्याने सामान्य दगडांना ‘ऊर्जित’ दगड किंवा यंत्रे असल्याचे सांगून त्यांची हजारो ते लाखो रुपयांना विक्री केली. काही भाविकांना त्याने परदेशात (विशेषतः आग्नेय आशियाई देशांत) जाऊन विशेष विधी करण्यास भाग पाडले, ज्यासाठी त्याने स्वतःचीच एजन्सी वापरून मोठी रक्कम उकळली. मिरगावच्या मंदिरात अमावस्या-पौर्णिमेला अंधाऱ्या वातावरणात बनावट साप सोडून किंवा कृत्रिम ध्वनी वापरून लोकांना ‘साक्षात्कार’ होत असल्याचा बनाव तो रचत असे.