anjali damania reaction on sunetra pawar oath taking ceremony : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला तर छगन भुजबळ यांच्याकडून प्रस्तावाला अनुमोदन दिले. थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देखील घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दमानिया यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “सत्ता आणि स्वार्थ आता हेच एकमेव सत्य आहे. पूर्ण महाराष्ट्र हळहळत होता, अगदी माझ्यासारखी व्यक्ती, जी अजित पवारांविरोधात अगदी टोकाचं लढली, १५ वर्ष मी लढा दिला… तरी ज्या पद्धतीने त्यांचा अपघात झाला, अतिशय अस्वस्थ, काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. असं व्हायला नको होतं असं वाटत होतं. पूर्ण महाराष्ट्रातील जनता हळहळत होती, आणि अशातच अगदी तीनच दिवसात… काल अस्थी विसर्जन झालं आणि रात्री तिकडून सगळी मंडळी मुंबईला रवाना झाली. का? तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची म्हणून, मला हे कुठेतरी खटकलं,” असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
सत्तेच्या पुढे काहीच नाही. ना भावना आहेत ना आपलेपणा आहे. कुटुंबाला पण नाही आणि त्यांच्याबरोबर काम करणार्या लोकांना देखील नाहीत. इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, इतकी काय घाई झालीकी त्या व्यक्तीला तीन दिवसांत लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी. हे सगळं बघून मन खूप अस्वस्थ झालं.
सत्ता आलीच असती. उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाल्या असत्या तर सगळ्यांनाच पहिली महिला उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला असता. पण इतकी घाई न करता थोडसं थांबून हे केलं असतं तर जास्त बरं झालं असतं. पण आत्ताच्या घटकेला मला याच्या मागे फक्त भाजपाचा सत्तासंघर्ष दिसतोय, त्यांना कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादी आणि शिंदे गट देखील संपवायचा आहे, असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
भाजपाने केलेलं एक मोठं षडयंत्र आहे, की सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावा, इतकंच नाही तर त्यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करा, म्हणजे शरद पवारांना त्यांच्याबरोबर जायचं असेल तर त्यांना उतरतं माप घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. एकदा त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केलं की, सुनेत्रा पवारांना राजकारणातलं फारसं माहिती नाहीये, त्यामुळे त्या कंट्रोलमध्ये राहतीलचं, वित्तमंत्री पद त्यांनी स्वतःकडे करून घेतलं आहे, यामधूनच हा भाजपाचा मोठा गेम आहे हे सरळ-सरळ दिसत आहे, असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

