Anjali Damania criticizes CJI Surya Kant for His Cockroach Remark: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळाशी केली होती. “बेरोजगार तरुण माध्यम आणि समाजमाध्यमांतून टीका करतात. काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले चढवतात”, अशी टिप्पणी न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान केली होती. या टिप्पणीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यावर टीका केली आहे.
अंजली दमानिया सातत्याने सरकारमधील भ्रष्टाचार, राजकीय नेत्यांची चुकीची प्रकरणे यावर आवाज उचलत असतात. अनेक सामाजिक, राजकीय घटनांवर त्यांचे भाष्य असते. आता त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लक्ष्य केले आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या टिप्पणीसंदर्भात त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “सरकारला प्रश्न विचारणे, पारदर्शकतेची मागणी करणे, हे जर चुकीचे असेल तर होय मी झुरळच आहे आणि झुरळच राहणार. मला त्याचा अभिमान आहे. हे कुठेतरी भलत्या दिशेने जाताना दिसत आहे. सरकारकडून आपण काहीच अपेक्षा करू शकत नाही. राजकारणी हवे तसे वागत आहेत. याला जर आपण प्रश्न विचारत असू आणि आपल्याला झुरळ म्हटले गेले तर प्रश्नचिन्ह निर्माण होते.”

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.
“माननीय सरन्यायाधीश साहेब, होय मी ‘झुरळ’ आहे! मी एक भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ती आहे आणि याचा मला अभिमान आहे. झुरळ कधीही मरत नाही, ते टिकून राहते, लढत राहते. पारदर्शकता आणि जबाबदारी मागणे हा ‘हल्ला’ नाही, तो आमचा संविधानिक अधिकार आहे. न्यायव्यवस्था जेव्हा नागरिकांना ‘कीटक’ म्हणते, तेव्हा प्रश्न विचारणे आणखी गरजेचे बनते”, अशी टीका दमानिया यांनी एक्स पोस्टद्वारे केली आहे.
संविधानाच्या वर कुणीही नाही
सरन्यायाधीशांच्या विधानावर सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली जात आहे, असेही अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या. “कुणीही संविधानाच्या वर नाही. सरन्यायाधीशांनी केलेले विधान संविधानाच्या विरोधात आहे. व्यवस्थेच्या विरोधात कुणी प्रश्नच विचारायचे नाही, असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. प्रश्न विचारणारे नाही”, असेही दमानिया यांनी म्हटले.

वकिलाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान केले विधान
दिल्लीतील एका वकिलाच्या याचिकेवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी व्यवस्थेवर हल्ले चढवणारे परजीवींप्रमाणे असल्याचेही म्हटले. आपल्याला वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका वारंवार करत असल्याबद्दल सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
याचिकाकर्त्याने समाजमाध्यमावर व्यक्त केलेल्या मतांबद्दल सरन्यायाधीशांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “व्यवस्थेवर हल्ला करणारे परजीवी समाजात आधीच भरलेले आहेत. आता तुम्हीही त्यात सामील होणार का?… काही तरुण झुरळासारखे असतात, ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्यावसायिक स्थान नसते. त्यातले काही माध्यमांत जातात, काही समाजमाध्यमांत जातात, काही जण माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा अन्य कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवर हल्ले करत सुटतात”, असे विधान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले.
