पुण्यातल्या अल्पवयीन गर्भश्रीमंत मुलाने वडिलांच्या आलिशान पोर्श कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुणांना (दुचाकीवरून प्रवास करत असताना) धडक दिली होती. त्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपीला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रयत्न झाले. आरोपीच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. अटकेनंतर अवघ्या काही तासांतच ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन आरोपीचा जामीन मंजूर झाला. आरोपी मध्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते, मात्र त्याने मद्य प्राशन केलं नव्हतं असं सिद्ध करण्यासाठी ससून रुग्णालयात त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागातील दोन डॉक्टर अटेकत आहेत. दरम्यान, हे दोन्ही डॉक्टर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांच्या आशीर्वादामुळे ‘ससून’मध्ये असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही आरोप होऊ लागले. तसेच ते या विषयावर काहीच बोलत नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दरम्यान, आरोपीच्या वडिलांचे आणि अजित पवारांचे हितसंबंध असून त्यांच्यात आतापर्यंत अनेक राजकीय व्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर वेगवेगळे आरोप केले आहेत. या अपघात प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. “याप्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करावी”, अशी मागणीही दमानिया यांनी केली होती. दमानिया म्हणाल्या, “या अपघात प्रकरणानंतर अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना अनेक फोन केले होते. मी हे अनेक पत्रकारांच्या समाज माध्यमांवरील पोस्ट आणि प्रसारमाध्यमांवरील बातम्यांच्या आधारे बोलत आहे. अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केल्याची शंका माझ्याही मनात होती. तसेच ते अनेक दिवस या प्रकरणावर काहीच बोलत नव्हते.”

दमानिया म्हणाल्या, “पुण्यातील अपघात प्रकरणानंतर होऊ लागलेल्या आरोपांवर अजित पवार धादांत खोटी उत्तरं देत आहेत. अजित पवार आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अजित पवारांचा फोन जप्त करायला हवा आणि त्यांची नार्को टेस्ट करायला हवी”. अंजली दमानियांच्या मागणीवर अजित पवारांनीही उत्तर दिलं. “मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. परंतु, नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो, तर तिने (अंजली दमानियांनी) पुन्हा माध्यमांपुढे यायचं नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा”, असं अजित पवार म्हणाले होते.

हे ही वाचा >> “मोदी, तुम्ही शाळेत गेला असतात तर..”, महात्मा गांधींवरच्या वक्तव्यावरुन प्रकाश राज यांचा पंतप्रधानांना टोला

दरम्यान, अजित पवारांचं हे आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारलं आहे. अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मी नुकतीच प्रसारमाध्यमांवर अजित पवारांची एक प्रतिक्रिया पाहिली. यामध्ये ते म्हणतायत की ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत. मात्र, त्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातून सन्यांस घेतला पाहिजे, घरी बसलं पाहिजे. मी त्यांचं हे आव्हान स्वीकारते. तुम्ही कृपया तुमची नार्को टेस्ट करा. तुमचा विशाल अग्रवालशी (अल्पवयीन आरोपीचे वडील) संबंध नाही, तुम्ही या प्रकरणात काहीही केलेलं नाही, हा तुमचा दावा खरा ठरला तर यापुढे मी यातल्या कोणत्याही गोष्टीवर काहीही बोलणार नाही, मी तुम्हाला शब्द देते. तुम्ही नार्को टेस्ट केलीत तर मी या प्रकरणावर कुठेही वाच्यता करणार नाही. मी तुमचं आव्हान स्वीकारते. परंतु, माझी एक विनंती आहे की तुमच्या नार्को टेस्टसाठी प्रश्नावली मी देणार. मी दिलेले प्रश्न तुम्हाला नार्को टेस्टमध्ये विचारले जातील, एवढंच माझं सांगणं आहे.