Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates : मयुरी जगताप (हगवणे कुटुंबियांची मोठी सून) हिने तिच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले होते. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तिच्या भावाने मयुरी जगतापवर होत असलेल्या अन्यायाबाबत पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. याबाबत आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही माहिती दिली. यावरूनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगावर टीका केली आहे. टीका करताना त्यांनी एक पत्रही जोडले आहे. महिला आयोगाला पाठवलेले हेच ते पत्र असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

वैष्णवी चा जीव वाचला नसता का? वैष्णवीची जाऊ, मयुरी, हिने महिला आयोगाला email करून तिला मारहाण केली, तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले. शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो व तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली . ती चिठ्ठी सुद्धा मी जोडत आहे, असं म्हणत ते पत्र अंजली दमानिया यांनी शेअर केले आहे.

मयुरी जगतापच्या भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात काय आहे?

लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासू सासरे यांनी तिच्याकडून गाडी आणि रोख रकमेची मागणी केली. तसंच, पती घरी नसताना मारहाण करून माहेरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आम्हाला राजकीय पाठिंबा आहे, असं म्हणत दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असं या पत्रात म्हटलं आहे.

तसंच, पती घरी नसताना सासू सासरे, दीर, नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले, मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला आणि दीराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे येत या भाषेत तिला शिवीगाळसुद्धा केली, असा दावाही या पत्राच्या माध्यमातून केला आहे. हे पत्र मयुरी जगतापच्या भावाने राज्य महिला आयोगाला पाठवले असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच, इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जात नमुद करता येऊ शकत नाही, असंही या पत्रात म्हटलं आहे.