Parth Pawar VSR Flight: अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमदार रोहित पवारांनी या अपघातावरुन व्हिएसआर कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. व्हिएसआर कंपनीच्या मालकाविरोधात रोहित पवार सातत्याने शंका उपस्थित करत आहेत. अशात पार्थ पवारांनी याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांची खासगी कामासाठी उपस्थिती आणि चार्टर प्रवासावर त्यांनी आक्षेप घेतला.

पार्थ पवारांच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह

अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट करुन पार्थ पवार यांच्या व्हिएसआर कंपनीच्या विमानातून केलेल्या प्रवासावर प्रश्न उपस्थित केले. “VSR कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो? त्या VSR कंपनी च्या चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो?”, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. दमानिया यांनी या पोस्टच्या सोबतीने प्रवाशांची माहिती असणारी शीट देखील जोडली आहे.

दमानियांनी शेअर केलेली पोस्ट काय?

दमानिया यांनी शेअर केलेल्या शीटनुसार, व्हिएसआर कंपनीच्या विमानाने २८ एप्रिल रोजी मुंबईतून उड्डाण घेतले. आणि हे विमान पुण्यात लँड झाले. या विमानात खासदार पार्थ पवार, राम चौबे, विकास पाटील, धीरज शर्मा आणि अभिषेक बोके यांची नावे आहेत. याशिवाय तीन जणांचा क्रू देखील यात आहे. कू सदस्यांमध्ये तिघेही पुरुष आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रवासावर सवाल

दमानिया यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी खासगी कामासाठी केलेल्या प्रवासावरुनही सवाल उपस्थित केला आहे. “सुनेत्रा पवारांचे ओएसडी राम चौबे आणि विकास पाटील सरकारी अधिकारी असून सरकारी पगार घेतात पण ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत”, अशी टीका त्यांनी केली. “हेच ते दोघे पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते. तेव्हा ते अजित पवारांचे स्वीय सहाय्यक होते, आता सुनेत्रा पवारांचे आहेत”, असे दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

parth pawar flight vsr
प्रवाशांची माहिती X/ Anjali Damania

तीन प्रश्न

या प्रकरणावरुन दमानिया यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारी अधिकारी खासगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून आले? आणि VSR च्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे?, असे
सवाल दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.