कर्जत: नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून नैराश्य आलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे काल, शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. अंकिता सुरेश सांगळे (वय १९, रा. जलालपूर, कर्जत) असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीमध्ये नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा उल्लेख आहे.
अंकिताने नीटची फेरपरीक्षा दिली होती. त्यामध्ये आपण थोडक्यात कमी गुणाने पात्र ठरलो नाही अशी खंत तिला वाटत होती. त्याचे नैराश्य तिला आले होते, असे तिचे काका अण्णा सांगळे यांनी सांगितले तर आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीजवळ चिठ्ठी सापडली. याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी सांगितले.
अंकिताचे काका अण्णा सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिताला नीट परीक्षेत १६६ गुण मिळाले होते, अपेक्षित गुण मिळाले नाही म्हणून ती मानसिक तणावाखाली होती. घटना घडली त्यावेळी तिचे वडील व भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. घरामध्ये आई होती, परंतु ती कामांमध्ये व्यस्त होती. अंकिताला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात आलेली होती. त्यामध्ये बसून ती अभ्यास करत होती. बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही, म्हणून आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिले तर समोरील दृश्य पाहून त्या घाबरून गेल्या.
त्यांनी तात्काळ शेजारी असलेल्या कुटुंबांना आवाज दिला. परिसरातील लोक धावत आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. या संदर्भात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंकिता हिच्यावर जलालपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंकिताने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले की, २१ जूनला झालेल्या नीट परीक्षेमध्ये तिला १६६ गुण मिळाले आणि कट ऑफ १७७ आहे. ही परीक्षा तिने अहिल्यानगर येथे असलेल्या केंद्रातून दिली होती. अपेक्षित यश या परीक्षेत मिळाले नाही त्यामुळे मला नैराश्य आले आहे. डॉक्टर होण्याची स्वप्न पूर्ण झाले नाही. या आत्महत्येसाठी माझे आई-वडील, भाऊ यापैकी कोणालाही जबाबदार धरू नये. असेही चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.
अंकिता हिला डॉक्टर व्हायचे होते. ३ मे रोजी तिने नीट परीक्षा दिली होती. यामध्ये तिला चांगले गुण मिळाले होते, मात्र पेपर फुटल्यामुळे पुन्हा २१ जूनला परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये तिला १६६ गुण मिळाले. १७७ गुणांना ‘कट ऑफ’ होते. आपण पात्र ठरलो नाही, याची खंत तिला वाटत होती. त्यामुळे तिला नैराश्य निर्माण झाले होते. -अण्णा सांगळे, अंकिताचे काका
उपलब्ध माहितीनुसार अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र अधिक सखोल तपास सुरू आहे. -हनुमान गायकवाड पोलीस निरीक्षक, कर्जत
