तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसतात? ‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप!

काय म्हणाले अण्णा हजारे?

“मॉल संस्कृती ही काही भारतीय संस्कृती नाही. ही विदेशातली संस्कृती आहे. विदेशातील संस्कृती भारतात आणायची आणि मग तिथे नको ते गोष्टी विकायला ठेवायच्या हे बरोबर नाही. आताचं सरकार मॉल, दारू या सारख्या गोष्टींचा विचार करणार नाही, असा मला विश्वास आहे. मात्र, असं काही घडलचं तर आम्हाला आमच्या मार्गाने आंदोलन करावे लागले”, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे.

हेही वाचा – Vedanta Foxconn : सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही – रोहित पवार

शंभूराज देसाईंनी दिले होते संकेत

दरम्यान, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मॉलमधली वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले होते. “मॉलमध्ये वाईन विक्रीचा मसुदा जेव्हा जनेसाठी खुला करण्यात आला होता. आम्ही या संदर्भात लोकांची मत जाणून घेतली. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अनेकांनी याबाबत सुचना केल्या आहेत. त्यानुसार या निर्णयाच्या समर्थनात आणि विरोधात किती जणं आहेत, त्याचा अभ्यास सुरू आहे. विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर काम करत आहेत. येत्या १५ दिवसांत यासंदर्भातला अहवाल माझ्याकडे येईल, त्यानंतर मी स्वत: याचा अभ्यास करून लोकांची मत काय आहेत, हे जाणून घेतल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चाही करणार आहे”, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली होती.