राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. तसचे कर्मचारी आणि नागरिकांनाही सरकारवर दबाव वाढविण्यास सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली होती. हजारे प्रत्यक्षात आंदोलनात सहभागी होणार नसले तरी आंदोलन तीव्र करण्यासंबंधी काही सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केल्या आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची तयारीही हजारे यांनी दर्शविली.

अण्णा हजारे म्हणाले, “सरकार आणि आंदोलनकर्ते यांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. मात्र, ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी लाखो नागरिकांनी एकाचवेळी बाहेर पडणे गरजेचे आहे. दबाव आल्याशिवाय आणि सरकार पडू शकते, असे वाटल्याशिवाय कोणतेही सरकार हालत नाही. मात्र, कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन शांततेच्या आणि असंहिसेच्या मार्गाने करायला पाहिजे. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची यामध्ये हानी होता कामा नये, असेही हजारे यांनी कर्मचाऱ्यांना बजावले.”

एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा – मनसेची मागणी

सध्या सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपात तोडगा काढण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांना लगेचच सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. विविध सरकारी मंडळे किंवा उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन यापूर्वीच लागू झाला आहे. याच धर्तीवर एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांच्या वेतनात वाढ होऊ शकेल, असे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. एस.टी. कर्मचाऱ्यांची सेवा सरकारी सेवेत विलीनीकरणाची मागणी असली तरी हा निर्णय घेण्यास कालावधी लागू शकतो. त्यापेक्षा सातवा वेतन आयोग लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल, अशी भूमिका मनेसेने मांडली.