अहिल्यानगर : सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा उपोषणाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले आहे. दि. ३० जानेवारी २०२६ पासून राळेगणसिद्धी गावातील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार असल्याचे हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून जाहीर केले आहे.
याच मागणीसाठी अण्णांनी यापूर्वी ३० जानेवारी २०१९ मध्ये सात दिवस यादवबाबा मदिरात उपोषण केले होते. त्यानंतर आता ते सहा वर्षांनी ते उपोषणाला बसणार आहेत. या पत्रामध्ये हजारे यांनी म्हटले की, राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा यासाठी २३ मार्च २०१८ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर सात दिवसांचे उपोषण करण्यात आले आणि त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धीच्या यादबबाबा मंदिरात सात दिवसांचे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर कायदा करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे ५ सदस्य आणि सिव्हिल सोसायटीचे ५ सदस्य अशी संयुक्त मसुदा समिती स्थापन करून समितीच्या एकूण ९ बैठका घेऊन लोकायुक्त कायद्याचा मुसदा तयार करण्यात आला.
दरम्यान, २८ डिसेंबर २०२२ रोजी राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर १५ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. २० डिसेंबर २०२४ रोजीच्या आपल्या पत्रात लोकायुक्त विधेयकास राज्यपालांनी मान्यता दिली आहे आणि हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजूरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा शासन करत आहे असे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पाठवलेल्या पत्रात नमुद केले आहे.
परंतु मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पत्राला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि कायदा विधान परिषदेमध्ये मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापि राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा काही माझा वैयक्तिक प्रश्न नाही. देशातील जनतेचा प्रश्न आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे. एवढा प्रदीर्घ काळ झाल्यानंतरही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नाही, यावरून हे स्पष्ट होते की, राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही, याकडे हजारे यांनी लक्ष वेधले आहे.
त्यामुळे मी विचार केला की, हृदयविकाराने मृत्यू येण्यापेक्षा देश आणि समाजाच्या हितासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन. म्हणून आपणास स्मरण करून देत आहे की, आपल्या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने मी राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरामध्ये दि. ३० जानेवारी २०२६ पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करीत आहे, असा इशारा अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे.
