Anna Hazare writes to PM Narendra Modi::सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारताने जागतिक स्तरावर शांतता व संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.
अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यामधील सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी पंतप्रधानांना हे पत्र आज, शनिवारी पाठवले आहे. अण्णा हजारे सध्या राळेगणसिद्धी येथे आहेत. अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात सध्याची जागतिक परिस्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे नमूद केले आहे. विविध देशांमधील वाढता तणाव व संघर्ष यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित होत चालले आहे. या घटनांमधून निरपराध महिला, बालके, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर होणारा परिणाम हा अतिशय दुःखदायक व वेदनादायी ठरतो असल्याकडे लक्ष वेधले आहे.
भारताची संस्कृती ही अहिंसा व शांततेची आहे. आपल्या देशाने नेहमीच जागतिक परस्पर संवाद व शांतता याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीवादी देशाने मानवता व शांततेचा संदेश देणे अत्यंत आवश्यक असल्याचे हजारे यांनी पत्रात नमूद केले आहे. आज जगातील देशांना शस्त्रास्त्रे नव्हे तर परस्पर विश्वास व संवाद आवश्यक आहे. युद्धातून केवळ विनाश होतो, परंतु संवादातून समाधान व स्थिरता याचा मार्ग दाखवला जातो. माझी आपल्याला विनंती आहे की, भारताने तटस्थ व जबाबदार भूमिका स्वीकारत जागतिक शांतता व संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने जागतिक स्तरावर अनेक मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. सध्याच्या जागतीक तणावाच्या संवेदनशील परिस्थितीत भारताची मानवतावादी व शांततेच्या मार्गाची भूमिका जगासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मानवतेचे हित व निरपराध नागरिकांची सुरक्षा यासाठी भारताने शांततेच्या मार्गाने पुढे जावे असेही आवाहन पत्रात हजारे यांनी पंतप्रधानांना केले आहे.
ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी देशातील भ्रष्टाचार, निवडणूक पद्धत, मतदानाचा अधिकार, माहिती अधिकार, लोकपाल विधेयक, दारूबंदी आदी सुधारणांसाठी वेळोवेळी लोकसहभागातून आंदोलने करून सरकारला कायद्यात बदल करणे भाग पाडलेले आहे. त्यासाठी गावपातळीपासून थेट दिल्लीपर्यंत आंदोलने केली आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना राजीनामेही द्यावी लागले आहेत.
