अहिल्यानगर: दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता राज्य सरकारने जलसंधारणाच्या कामांना अधिक प्राधान्य द्यावे, अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना केली आहे. हजारे यांनी केलेल्या या सूचनेची अंमलबजावणी करणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
अण्णा हजारे काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी मंत्री विखे यांनी त्यांची भेट घेतली होती, त्यानंतर आता अण्णा हजारे पुन्हा राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे आल्याचे समजल्यानंतर मंत्री विखे यांनी त्यांची काल, बुधवारी सायंकाळी भेट घेतली. मंत्री विखे टंचाई आढावा बैठकीसाठी पारनेर येथे उपस्थित होते, त्यानंतर ही भेट झाली. यावेळी समवेत भाजपचे जिल्हा समन्वयक विनायक देशमुख, सुजित झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.
अण्णा हजारे व राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा अनुषंगाने चर्चा झाली. शासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्री विखे यांनी दिली. गावागावात पाणी अडवणे, पाणी जिरवणे, नाला खोलीकरण, बंधारे, गाळ काढणे तसेच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज हजारे यांनी अधोरेखित केली. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले. जलसंधारही केवळ शासनाची जबाबदारी न राहता लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजची दुष्काळी परिस्थिती ही भविष्यासाठी जलव्यवस्थापनाचे धडे देणारी आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणे आणि जिरवणे यासाठी गाव पातळीवर नियोजन करून जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे, असेही हजारे यांनी सुचवले. हजारे यांचा हाच मोलाचा सल्ला शासन कृतीत उतरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिली. राळेगणसिद्धी येथे पूर्वी झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे परिसरात वनराई टिकून आहे, त्याच पद्धतीने दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर व लोकसहभाग या तीनही बाबींना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक गावात काम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
