NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या CJP च्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “हिंसेने कधीही प्रश्न सुटत नाहीत. मी माझ्या आयुष्यात २२ वेळा उपोषणे केली, पण कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. त्या अहिंसक मार्गामुळेच देशात १० महत्त्वपूर्ण कायदे बनू शकले,” अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आंदोलनांचे स्वरूप आणि अहिंसेचे महत्त्व अधोरेखित केले.

“कोण जिंकलं आणि कोण हरलं, यापेक्षा समाजाचे भले महत्त्वाचे”

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, “कोणत्याही समस्येचे उत्तर हे संवादातूनच निघते. चुकीच्या मार्गाने जाऊन किंवा हिंसेचा आधार घेऊन कधीही कायमस्वरूपी प्रश्न सुटत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कोण हरले आणि कोण जिंकले, याला मी महत्त्व देत नाही. मात्र, समाजाच्या भल्यासाठी जे काही करणे शक्य आहे, ते अहिंसक आणि सनदशीर मार्गाने सातत्याने होत राहिले पाहिजे.”

अहिल्यानगरमध्ये अण्णांचे मौन आंदोलन

दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन केले होते. “आंदोलकांवर दडपशाही करण्याऐवजी सरकारने त्यांच्याशी थेट संवाद साधावा,” अशी आग्रही भूमिका त्यांनी फलकांच्या माध्यमातून मांडली होती. NEET पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करत त्यांनी शासनाने मध्यस्थी करून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली होती.

३५ दिवसांचे आंदोलन मागे; सीजेपीची (CJP) संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आणि इतर प्रमुख मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील यशस्वी चर्चेनंतर, CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलकांवरील गुन्हे (FIR) मागे घेणे आणि आंदोलनात जखमी झालेल्यांना भरपाई देणे या मागण्यांवर सहमती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यात काय म्हटले?

आपल्या राजीनाम्यात धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारीचा स्वीकार करत भावना व्यक्त केल्या:

“मी चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी समर्पित राहिलो आहे. ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलत तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनरुपरीक्षेची नवीन तारीख जाहीर केली. तसेच आगामी काळात ही परीक्षा संगणकाधारित (CBT मोड) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी संपूर्ण सरकारने एकत्रित काम केले. मी देशातील तरुणांच्या अपेक्षांचा आदर करतो आणि याच नैतिक कर्तव्यातून पदाचा त्याग करत आहे.”

केंद्रीय मंत्रिमंडळातील अत्यंत वजनदार मानल्या जाणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांच्या या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे.