केंद्रात व महाराष्ट्रातही सत्तेवर आलेली भारतीय जनता पक्षाची राजवट ही बाह्य़त: कितीही लोकशाही पद्धतीचा आधार घेत सत्तेवर आली असली तरी त्यांच्या अंतर्यामीचा भाव स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या लोकशाहीशी सुसंगत असणाऱ्या ऊर्मीशी जुळता असण्याची किंवा होण्याची फारशी शक्यता वाटत नाही. म्हणूनच सत्याची धार असणारे अस्त्र कायदे पाळून वापरले गेले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सतीश काळसेकर यांनी केले. सहावे राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडीच्या बॅ. नाथ पै सभागृहात सुरू झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून सतीश काळसेकर बोलत होते. संमेलन उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे, स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष बबन साळगांवकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. राजन गवस, जयानंद मठकर, प्रा. आनंद मेणसे, कलानी ठोंबरे, एकनाथ आव्हाड, उद्धव कांबळे, उदय नारकर, प्रा. प्रवीण बांदेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते. सकाळी केशवसुत कट्टय़ावरून ग्रंथदिंडी निघाली, त्यानंतर चळवळीची गाणी शाहीर सदाशिव निकम, शीतल साठे व सहकाऱ्यांनी सादर केली. संमेलनाचे उद्घाटन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.  अण्णा भाऊ साठेंचे समग्र विचार सर्वांपर्यंत पोहचले पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाला विरोध करणारे सत्तेवर आले आहेत. हिटलरलाही जर्मनीत निवडून दिला होता, पण तो लोकशाही मानत नव्हता असे कॉ. गोविंद पानसरे म्हणाले.  यावेळी बोलताना प्रा. राजन गवस म्हणाले, काळाचे, वर्तमान व भविष्याचे विचित्र गरगरणे आहे. त्याची भाषा शोधली पाहिजे. आजच्या तरुणांनी आजच्या भाषेशी सुसंगत मार्ग काढला पाहिजे.  यावेळी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी सावंतवाडी शहर, साहित्य परंपरेची मांडणी केली, तर प्रा. प्रवीण बांदेकर यांनी संमेलनाची भूमिका मांडली. या संमेलनाचे उद्घाटक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी, लोकांना वंचित ठेवण्यापेक्षा समाजाच्या मध्य प्रवाहात आणण्यासाठी लेखकांनी साहित्य निर्माण केले पाहिजे. समाजात अनेक वंचित अंध, अपंग, अज्ञान लिहीत आहेत, त्यांना समाजाने ओळख दिली पाहिजे. असे डॉ. लवटे म्हणाले.