अहिल्यानगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतील सुमारे ५ हजारांवर लाभार्थ्यांची दलालांनी फसवणूक केल्याचे उघडकीस येऊनही व यासंदर्भात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही तपास झाला नाही, पोलिसांनी आरोपींना अटकही केली नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्याची मागणी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज, मंगळवारी अहिल्यानगरमध्ये येऊन महामंडळाच्या जिल्हा शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यासंदर्भात माहिती देताना नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रात खाडाखोड करून, कागदपत्रांचा दुरुपयोग करून लाभार्थ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत. बँकांच्या कर्ज मंजुरी प्रकरणाच्या कागदपत्रातही खडाखोड झाल्याचे निदर्शनास आले आहे. कमी रकमेचे कर्ज मंजूर झाले असताना अधिक रक्कम मंजूर केल्याची खडाखोड करण्यात आली आहे. या संदर्भात राहुरीतील दोघांविरुद्ध नोव्हेंबर २०२५ रोजी शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशाच स्वरूपाची फसवणूक नाशिक व छत्रपती संभाजीनगरमध्येही करण्यात आल्याचे आढळले. या दलालांनी लाभार्थ्यांच्या कागदपत्रात आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक व ई मेल दिलेला आहे श. त्यामुळे व्याजाच्या परताव्याची रक्कम या दलालांच्या खात्यावर जमा झाल्याचे आढळले आहे. नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील फसवणूक झालेल्यांची संख्या सुमारे १० हजारांवर आहे. महामंडळाचा एक कर्मचारी यामध्ये सहभागी असल्याचे आढळले. त्याला कमी करण्यात आले आहे.

मात्र गुन्हा दाखल होऊनही पुढे काहीच तपास झाला नाही. आरोपींना अटकही झाली नाही. या गुन्ह्याच्या तपासाला गती देण्यासाठी खास पथक नियुक्त करावे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळाकडून राज्यात आत्तापर्यंत १ लाख ७९ हजार ९२९ जणांना १६३४ कोटींचा व्याज परतावा मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात हीच रक्कम १४३ कोटीची आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण २१ हजार उद्योजक मराठा समाजातून उभे राहिल्याचा दावाही त्यांनी केला. महामंडळाच्या जिल्हा शाखेने गेल्या वर्षभरात ४७८६ लाभार्थ्यांना १५५ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

व्यवस्थापकीय संचालकांच्या अटी जाचक

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी लाभार्थ्यांच्या उत्पन्नाच्या अटी व शर्तीमध्ये परस्पर बदल केला. राज्य सरकारने ज्या अटी व शर्तींना मान्यता दिली नाही, अशा अटी व शर्ती त्यांनी लागू केल्या. त्याला महामंडळाचीही मंजुरी घेतलेली नाही. दिवाळीनंतर महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झालेली नाही. या अटी व शर्ती लाभार्थ्यांसाठी जाचक असल्याने त्या वगळाव्यात अशा मागणीचे पत्र आपण व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.