जिल्ह्य़ात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे फळबागा व रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्हा आपदग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी बुलढाणा जिल्हा डाळिंब उत्पादक संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये वादळी वारा, पाऊस, गारपीट यामुळे फळबागा, डांळिब, मोसंबी, पेरू, चिकू, द्राक्ष, आंबा, निंबू, सीताफळ, रब्बीची पिके, गहू, हरबरा, मका, मिरची, कांदा, केळी, पपई, सर्व भाजीपाले याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले व अजूनही होत आहेत. त्यामुळे शेतकरी तसेच शेती संबंधित व्यवसाय करणारे व्यापारी, वाहतूकदार, विक्रेते, रोजगार यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
यावर्षी झालेले व होत असलेले नुकसान सहन करण्यापलीकडचे असल्याने बुलढाणा जिल्हा आपद्ग्रस्त घोषित करून तात्काळ आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, शेतकऱ्यांना या संकटाच्यावतीने स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठाने, वैयक्तिक मदत करणारे दाते यांनी पुढाकार घेऊन काही गावे, शेतकरी गट फळबाग, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.