पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून दोन लाख रुपये उकळणाऱ्या आणि ही रक्कम परत मागितल्यानंतर दमदाटी करणाऱ्या म्हसरुळ येथील संतोष गोरडे उर्फ मम्मी या भगताचा अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला. दरबार भरवून भानामती करणे, बाहेरची बाधा काढणे, पाऊस पाडून पैसे दुप्पट करणे अशा भुलथापा देऊन हा भगत गोरगरिबांची लुटमार करत होता. अंनिसने हिसका दाखविल्यावर गोरडेने संबंधित महिलेचे पैसे परत करून आपला दरबार बंद करत असल्याचा लेखी माफीनामा दिला.
शहरातील म्हसरूळच्या म्हसोबावाडी भागात दरबार भरविणाऱ्या संतोष गोरडे उर्फ मम्मी विरुद्ध कलाबाई चव्हाण यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मोलमजुरी करणाऱ्या चव्हाण कुटुंबियाला मागील वर्षी या भगताबद्दल माहिती समजली होती. पैशांचा पाऊस पाडून तो रक्कम दुप्पट करून देत असल्याचे समजल्यावर कलाबाईंनी नातेवाईकांकडून दोन लाख रुपये उसने घेतले आणि भगताला दिले होते. त्यानंतर पैशांचा पाऊस काही पडलाच नाही. वारंवार आश्वासने देऊन भगताने वेळ मारुन नेली अन् पैसेही परत केले नाही, असे चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. वारंवार पैशांची मागणी केल्यावर गोरडेने धमकाविण्यास सुरुवात केली. या घटनेत आपली फसवणूक झाल्याची तक्रार चव्हाण यांनी केली. हा प्रकार समजल्यावर अंनिसचे कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे आदींनी पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी भोंदू भगताला पंचवटी पोलीस ठाण्यात आणले. प्रारंभी संशयिताने महिलेकडून पैसे घेतले नसल्याचा पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांनी त्याला जाहीर दरबार भरविण्याचे आव्हान दिले. गोरगरिबांना फसवणुकीची प्रकरणे आपल्या अंगाशी येतील याची जाणीव झाल्यावर गोरडेने तक्रारदार महिलेकडून पैसे घेतल्याचे तसेच दरबार भरवून गोरगरिबांची फसवणूक केल्याचे लेखी मान्य केले. चव्हाण कुटुंबियांचे पैसे परत करण्याबरोबर आपला दरबारही बंद करत असल्याचे त्याने माफीनाम्यात लिहून दिले. भोंदू भगताच्या लेखी माफीनाम्यामुळे कोणताही गुन्हा दाखल न करता या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.