अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात कारागृहात असेलल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोबाईल फोन पुरविल्याची बाब दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, त्यांना मोबाईल फोन पुरविल्याप्रकरणी दोन कारागृह पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खातेनिहाय चौकशी नंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर तिघांनाही अलिबाग कारागृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कारागृहाच्या विलगीकरण कक्षात अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याची बाब समोर आली होती. यानंतर तीनही आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारागृह प्रशासनाने खातेनिहाय चौकशी सुरु केली होती. इतर कैद्याकडेही याबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी कारागृहातील दोन पोलीस पैसे घेऊन त्यांना स्वताचा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे समोर आले. यानंतर सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल कसा आला या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरु असल्याचेही कारागृह अधिक्षक ए.टी. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

फोन कसा पोहोचला याचा शोध

अर्णब यांच्यापर्यंत मोबाईल फोन कसा पोहोचला याचा शोध सुरु करण्यात सुरु आहे. आता अर्णब यांना मच्छर पळवण्याची कॉईल आणि अन्य काही सामग्री सुद्धा पुरवण्यात आल्याचे समोर येत आहे.