scorecardresearch

“तुमच्यात हिंमत असेल तर…” आशिष शेलारांचं भर विधानसभेत बाळासाहेब थोरातांना आव्हान

भाजपा-शिवसेना (शिंदे गट) आमदारांच्या गोंधळामुळे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.

Ashish Shelar Balasaheb Thorat
राहुल गांधी यांच्या वीर सावरकरांवरील वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात पडसाद उमटले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील वक्तव्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सावरकरांवरील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदारांनी लावून धरली. यावेळी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधासभेत मोठा गोंधळ घातला. तसेच काँग्रेस आमदारांनी राहुल गांधींच्या वतीने माफी मागावी अशी मागणीदेखील शेलार आणि शिरसाट यांनी केली.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा गोंधळ थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी आमदार काही थांबले नाहीत. शेवटी नार्वेकर यांनी १० मिनिटांसाठी विधानसभा स्थगित करण्याची घोषणा केली आणि ते सभागृहातून बाहेर पडले.

दरम्यान, आमदार आशिष शेलार म्हणाले की, “राहुल गांधी यांनी भारताबाहेर जाऊन भारताचा अपमान केला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.” शेलार यांनी काँग्रेस नेत्यांकडे माफीची मागणी केली. शेलार काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरातांना म्हणाले की, “बाळासाहेब थोरात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याप्रकरणी माफी मागा.”

हे ही वाचा >> “राहुल गांधींनी माफी मागावी”, सावरकरांवरील वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ, संजय शिरसाट आक्रमक, म्हणाले, “यांनी कसाबचा…”

आशिष शेलारांचं बाळासाहेब थोरातांना आव्हान

एका बाजूला संजय शिरसाट आणि दुसऱ्या बाजूने आशिष शेलार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झाले होते. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा नार्वेकर शेलारांना म्हणाले की, “मी तुम्हाला बोलण्यासाठी वेळ देतो.” त्यावर शेलार म्हणाले, “तुम्ही काय देणार आहात? हे लोक (काँग्रेस) माफी मागणार आहेत का?” दरम्यान, गोंधळ काही थांबला नाही. अखेर नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक १० मिनिटांसाठी स्थगित केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या