प्रगत होत चाललेल्या गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सातारा पोलीस क्राइम दला’ने ‘स्मार्ट फोन अॅप’ तयार करून राज्यात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकारे संपूर्ण राज्यातील माहिती संकलन करून त्याची जोडणी केली तर याचा वापर होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
सातारा पोलीस क्राइम दलाने विकसित केलेले ‘खोज’ या अॅपच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल उपस्थित होते.
गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पारंपरिक तपास पद्धतीचा व साधनांचा उपयोग होत असे, मात्र सध्या गुन्हेगारीत उच्चशिक्षित गुन्हेगारांचे प्रमाण वाढले असून ते अधिक धोकादायक आहे. असे गुन्हेगार प्रगत तंत्राचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी जुनी साधने व पद्धती कुचकामी ठरत आहेत. म्हणून पोलिसांनीही आता स्मार्ट होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सातारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले हे प्रगत अॅप पोलीस दलाला गुन्हेगारांच्या शोधाबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. खोज अॅपमध्ये सध्या सातारा जिल्ह्यातील गुन्हेगार, चोरीस गेलेली वाहने, मृतदेह आदींची माहिती भरण्यात आली आहे. राज्यात या प्रकारच्या घडलेल्या गुन्ह्यांची व गुन्हेगारांची माहिती या अॅपद्वारे जमा केली जावी तसेच गुन्हेगारांच्या हाताच्या ठशांचे संकलन करून ते प्रत्येकाकडे जोडणीद्वारे साठवले तर गुन्हेगारीवर नियंत्रण करणे सोपे जाईल. राज्यभरात या पद्धतीचा वापर व्हावा यासाठी आपण मंत्रिमंडळाच्या बठकीत मी आग्रह धरेन, असे शिवतारे यांनी सांगितले.
या वेळी जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, सातारा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत, नागरिकांसाठी तक्रार निवारण केंद्र, पोलीस कंट्रोल रूम व्हॅन तर आता पोलीस क्राइम कंट्रोल अॅप असे उपयुक्त उपक्रम सुरू केले आहे. आता एका कळीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हेगाराची आणि त्याबद्दलची इतर माहिती सोप्या पद्धतीने उपलब्ध होईल.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी या अॅपबाबत माहिती देताना सांगितले, की पहिल्या टप्प्यात हे अॅप पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांना ही याची आवृत्ती उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वसामान्य नागरिक या अॅपचा उपयोग करून, हरवलेली मुले, अनोळखी मृतदेह, चोरीला गेलेली वाहने याची माहिती मिळवू शकतील.
या वेळी या अॅपची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.