संप मागे घेण्याबाबत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत असून आज विविध आगारातून ३६ गाड्या धावल्या, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, संपामुळे एसटी महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक सुरू करण्याची आमची इच्छा आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, त्याची कुठेही अडवणूक होता कामा नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. कामगारांच्या उपस्थितीमुळे आज ३६ बसेस रवाना केल्या. सुमारे ८०० ते ९०० प्रवाशांनी प्रवासदेखील केला आहे. याशिवाय खासगी वाहनेदेखील आगारातून सोडल्या जात आहेत, असेही चन्ने यांनी सांगितले.




एसटीचे कर्मचारी कामावर परतावे यासाठी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब तसेच एसटी महामंडळ प्रशासनानेही आवाहन केले आहे. त्यानुसार अनेकांना कामावर परतायचे आहे. जे कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल, असे सांगतानाच अनेक कर्मचारी डेपो सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची वाहतूक सुरु होईल. त्यामुळे हा संप सुरू न ठेवता सर्व कामगारांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, असे आवाहनही शेखर चन्ने यांनी केले
अखेर एसटी महामंडळाने तोंड उघडले, संप मागे घेण्याचे कर्मचाऱ्यांना केले कळकळीचे आवाहन
तिकिटीसाठी ट्रायमॅक्सला कंत्राट
पत्रकार परिषदेदरम्यान ट्रायमॅक्स तिकिट कंत्राटाबाबत होत असलेल्या आरोपाबाबत चन्ने यांनी महामंडळाची भूमिका मांडली. ट्रायमॅक्स मशीन आपण भाड्याने घेतली नसून तीचे कंत्राट दिले आहे. करारामध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. मशीन घ्यायच्या झाल्या तर त्याला मनुष्यबळ, सॉफ्टवेअर लागणार. परंतु महामंडळाकडे तांत्रिक मुनष्यबळ नसल्याने ती विकत घेतलेली नाही. त्यासाठी वेगळा खर्च करावा लागेल म्हणून प्रत्येक तिकिट विक्री नुसार हे त्यांना कंत्राट दिलेले असते, असेही चन्ने यांनी सांगितले.
रोपे लावण्यासाठी २५ कोटी खर्च नाही
एसटी महामंडळाच्यावतीने राज्यभरात लावण्यात आलेल्या रोपांसाठी २५ कोटींचा खर्च केल्याचा आरोप चन्ने यांनी फेटाळून लावला. रोपांसाठी महामंडळाने वेगळे बजेट केले नव्हते. वनविभागाने मोफत रोपे पुरवली होती, त्यानुसार महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आगारांच्या आवारात जेवढी जागा उपलब्ध होती तेथे झाडे लावली. २०१९ मध्ये ८ हजार झाडे लावली होती, असे सांगतानाच त्यासाठी वेगळा खर्च केला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.