मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. दरम्यान, या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

“महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हा चिंतेचा विषय असून नुकतीच साकीनाका येथे घडलेली घटना पाहता महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वत्र पुरुष सुरक्षा रक्षकच दिसतात त्यांच्यासोबतच महिला सुरक्षा रक्षकही तैनात करावेत,” अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

“महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महाराष्ट्र व मुंबईचा नावलौकीक कमी होणार नाही यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याबाबत निर्णय घ्यावा, असा निर्णय झाल्यास महिला सुरक्षेच्यादृष्टीने ते आणखी महत्वाचे पाऊल ठरेल. महिलांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी दिशादर्शक राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक आहे. हा निर्णय झाल्यास देशातील इतर राज्यांनाही तो मार्गदर्शक ठरेल. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता या मागणीवर आपण गांभीर्याने विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.