अहिल्यानगर: पक्ष व राज्य शासन यांच्यातील समन्वयाचे काम संपर्कमंत्री म्हणून मी करणार आहे. कार्यकर्त्यांनी आपली कामे जिल्हाप्रमुखांकडे द्यावी. ते कामांची यादी माझ्याकडे पाठवतील, ती मार्गी लावण्याची संपर्कमंत्री म्हणून माझी जबाबदारी राहील. पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात खास ‘ओएसडी’ची नियुक्ती केली असून कार्यकर्त्यांनी त्या माध्यमातून लोकांची कामे मार्गी लावून संघटना मजबूत करावी, असे आवाहन शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्कमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आज, शनिवारी केले.

मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत आज शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, नितिन औताडे, कमलाकर कोते, महानगरप्रमुख सचिन जाधव, महिलाप्रमुख मीरा शिंदे, संभाजी कदम, संदेश कार्ले आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक दशदथ शिंदे, श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती अतूल लोखंडे यांच्यासह पाथर्डी व श्रीगोंद्यातील माजी पंचायत समिती सदस्यांनी पक्षप्रवेश केला.

मंत्री देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या कामांची दखल मी घेणार आहे. पक्ष संघटना वाढविण्याचे काम कार्यकर्त्यांनी जोमाने करावे. त्यासाठी तालुकानिहाय सदस्य नोंदणीचा आढावा झाला पाहिजे. संघटनेतील रिक्तपदे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भरावीत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेत आणि शासकीय समित्यांवर संधी द्या. नियुक्ती झाली, ओळखपत्र मिळाले म्हणजे झाले असे चालणार नाही. त्या ओळखपत्राचा वापर लोकांची कामे करण्यासाठी करावा, अशा शब्दांत मंत्री देसाई त्यांनी कार्यकर्त्यांना समज दिली.

निधीबाबत पालकमंत्र्यांशी बोलणार

राज्यात महायुतीचे सरकार असल्याने तिन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आमदार नाही अशा ठिकाणी शिवसैनिकांना निधी देण्यात येईल, त्याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांबरोबर बोलणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी काळजी करू नये, असे मंत्री देसाई म्हणाले.

ठाकरे-मनसे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणात गांभीर्य नाही

शिवसेना (ठाकरे गट) व मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची नुसत्या चर्चाच सुरू आहेत. या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य करतील, त्यावेळी त्यावर आम्ही आमचे मत मांडू, असे स्पष्टीकरण मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अजित पवारांकडून दुजाभाव; केवळ चर्चाच

विकास निधीच्या वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार दुजाभाव करत असल्याची फक्त चर्चाच आहेत. मात्र तरीही आम्ही आमच्या आमदारांशी चर्चा करू. दुजाभाव न होता सर्व आमदारांना विकास निधी कसा मिळेल याची दक्षता घेऊ, असे मंत्री देसाई म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागा वाटपाबद्दल शंका नाही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये होणाऱ्या जागा वाटपाबद्दल कोणतीही शंका नाही, असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले, भाजप, शिंदे सेना व अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांची समन्वय समिती आहे. ती प्रत्येक जिल्ह्याचा स्थानिक स्तरावर आढावा घेऊन तिन्ही पक्षाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडणार आहेत. विधानसभेत तिन्ही पक्षांनी मिळून २३७ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा वाटपाबाबत काहीही शंका नाही व महायुती म्हणून लढण्याचीच मानसिकता असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.