पारनेर : करोना संसर्गाचा वेगाने फैलाव होत असलेल्या तालुक्यातील अकरा गावांमध्ये करोना प्रतिबंधक उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पालक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर या गावांमध्ये आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षकांचा समावेश असणारी पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. या पथकांबरोबर प्रत्येक गावात चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पारनेरमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण नगर व इतर तालुक्यांपेक्षा अधिक आहे.  निघोज व परिसरात रुग्णालये व रुग्णालयांशी संबंधित औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, व्यवहार आठ दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले.

करोना संसर्गाचा वेगाने फैलाव होणाऱ्या गावांमध्ये पारनेर शहरासह निघोज, पठारवाडी, पिंपरी जलसेन, पिंपळगाव रोठा,भाळवणी,जवळे, कर्जुले हर्या, लोणीमावळा, वनकुटे, जामगाव या गावांचा समावेश आहे. या गावांमधील १०० टक्के कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

गंभीर रुग्णांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील समर्पित कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. इतर ठिकाणांहून गावात येणाऱ्या व्यक्तींना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अथवा माध्यमिक विद्यालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने करोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचे श्रीमती देवरे म्हणाल्या.