राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचलनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे आणि नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांच्यावर दीड लाखांच्या लाच प्रकरणात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तेजस गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून हिस्सा घेण्यास संमती दर्शवली असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराला कारखाना सुरु करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र हवं होतं. त्यांनी सरकार वाड्यातील प्राचीन वास्तूत कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालक आरती आळे यांच्याकडे यासाठी अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याच्या बदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या आदेशानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारली असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलीस निरीक्षक एन. बी सूर्यवंशी, सुवर्णा हांडोरे यांनी ही कारवाई केली.

आरती आळे प्रसूती रजेवर असताना घेतली लाच

आरती आळे या प्रसूती रजेवर होत्या तेव्हाच त्यांनी लाच स्वीकारली आहे. नाशिकच्या राणे नगर या ठिकाणी असलेल्या नयनतारा गृहप्रकल्पातील फ्लॅट क्रमांक १७ मध्ये त्यांनी दीड लाख रुपये स्वीकारले. यानंतर राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना हिश्शाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी संमती दर्शवली त्यामुळे तेजस गर्गेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात पर्यटन व सांस्कृतिक संचनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे यांचा सहभाग निष्पन्न झाला. लाच स्वीकारल्यानंतर आळे यांनी गर्गे यांच्याशी संपर्क साधून लाच स्वीकारल्याचे कळवले. त्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. प्राथमिक तपासात हे उघड झाल्यानंतर आळे यांच्यासह तेजस गर्गे यांच्याविरुध्द लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस गर्गे फरार

तेजस गर्गेंवर कारवाई झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. पोलिसांचं एक पथक आणि मुंबई लाचलूचपत विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत. बुधवारी त्यांचा पथकाकडून शोध घेण्यात आला पण हाती काही लागले नाही.

तेजस गर्गेंचं घर मुंबईतील घर गोठवण्याची कारवाई

या कारवाईनंतर तपास यंत्रणेने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक तेजस गर्गे यांची शोध मोहीम सुरू केली. परंतु, ते घरी सापडले नाहीत. पुण्याला गेल्याचे कळल्यानंतर पुण्यातही पथकाने शोध घेतला. परंतु, ते गायब झाले होते. मुंबईतील कफ परेड भागात गर्गे यांचे घर आहे. ते गोठविण्याची कारवाई करण्यात आली. तर सहायक संचालक आरती आळे यांच्या राणेनगर येथील घराच्या झडतीत साडेतीन लाखाची रोकड सापडली आहे.