“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल. महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजपा घाबरणार नाही. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर १०० पोलिसांनी वेढा घातला आहे. किरीट सोमय्या दहशतवादी आहे का? दहशतवादी उजळ माथ्याने फिरत आहेत. मुंबईत घातपात करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्यासाठी गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवण्यासाठी मुंबईत दहशतवादी काम करत आहेत. काही पकडले जात आहेत, काही पकडले गेलेले नाहीत. इकडे किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरण काढत असताना, त्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही कोल्हापुरला यायाचं नाही. तुम्हाला आम्ही कोल्हापूर रेल्वेस्टेशनवरून परत पाठवू. कोल्हापूरच्या सक्रिटहाउसला ताब्यात घेऊ. म्हणजे काय  लोकशाही संपली? जे म्हणायचं ते म्हणायचं नाही का? कशाच्या आधारावर तुम्ही त्यांना ताब्यात घेणार आहात? ही दंडूकेशाही चालणार नाही. तुम्ही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते दडपले जाणार नाहीत.”

तसेच, “किरीट सोमय्या यांनी पत्रकारपरिषदेत जे मांडलं ते पुरेसं आहे. अजून काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत, त्या मांडण्यासाठी व माहिती गोळा करण्यासाठी ते येत होते. तुम्ही थांबल्याने काही फरक पडत नाही. त्यांच्याकडे जे विषय आहेत ते मांडतीलच.”  असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

बिहारमध्ये जशी परिस्थिती होती,  दंडूकेशाही, गुंडगिरी, दडपशाही असं तिकडे सगळं नीट झालं, आता तुम्हाला महाराष्ट्रात निर्माण करायचं आहे का? भाजपा घाबरत नाही. किरीट सोमय्या तर घाबरत नाहीच. भाजपा त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. ते भाजपाचे नेते आहेत, माजी खासदार आहेत.  तुम्ही दडपल्याने हा विषय दडपला जाणार नाही. हा तर्कशुद्ध शेवटापर्यंत विषय जाईल.” असा इशारा चंद्रक३ांत पाटील यांनी दिला आहे.

हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते.