मटण दरवाढीच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिकेत आयोजित केलेल्या बैठकीत वादाची उकळी फुटली. महापालिका प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मटण विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालत असल्याचा आरोप करून कृती समितीने प्रशासनाला धारेवर धरलं. कोल्हापूर जिल्ह्यात मटण दरवाढीचा मुद्दा चांगलाच पाहण्यास मिळाला. या संदर्भात पालिका आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत चांगलाच गोंधळ झाला.

‘मटण दरवाढ कृती विरोधी समिती’ आणि महापालिका अधिकारी यांच्यातच जोरदार वाद झाला. मटणविक्री साठी आणलेली बकरी तपासणी करण्याच्या मुद्द्यावरून कृती समितीच्या सदस्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सर्वच मटण विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. काल मटण विक्रीचे निकष न पाळल्याने अन्न-औषध विभागाने मटण दुकानावर कारवाई केली होती. कोल्हापुरातील बहुतांश दुकानांमध्ये स्वच्छतेचे सर्वच नियम बाजूला ठेवून मटण विक्री सुरू आहे. त्यात अनेक ठिकाणी विक्रीसाठी आणलेली बकरी तपासणी न करताच कापली जाते आणि त्याची विक्री होते. निकृष्ट दर्जाचे मटण लोकांना विकत घेऊन खावे लागते हा मुद्दा कृती समितीच्या सदस्यांनी या बैठकीत उचलून धरला.

ज्याप्रकारे बुधवारी मटण दुकानावर छापा टाकून कारवाई करण्यात आली अशा प्रकारे आता सर्वच अस्वच्छ आणि आरोग्यास घाटक असणाऱ्या दुकानांवर कारवाईची मागणी आज आयुक्तांनी बोलविलेल्या बैठकीत कृती समितीने केली. कृती समिती सदस्य आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात वादावादी झाली. समितीने केलेले आरोप फेटाळून लावत अधिकाऱ्यांनी आपण नियमांनुसार काम करत असल्याचे स्पष्ट केले.