भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या उमेदवारांमध्ये नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर त्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष आहे. अशातच पंकजा मुंडे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाबाबत बोलणार असल्याचं वक्तव्य केलं. ते जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

अर्जून खोतकर म्हणाले, “पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी त्यात नाक खुपसण्याचं काहीही कारण नाही. परंतू बहीण म्हणून पंकजा मुंडेंबाबत वाईट वाटतं. एवढं मोठं घराणं असून या संधीपासून दूर राहिलं याचं वाईट वाटतं. त्यांचा विचार व्हायला हवा होता, सामान्य जनतेलाही तसंच वाटतं. अर्थात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.”

“पंकजा मुंडे यांच्याशी शिवसेनेत येण्याबाबत बोलेन, मात्र…”

“बहीण भाऊ म्हणून आमच्या ज्या काही अंतर्गत गोष्टी होतील त्यात आम्ही बोलू. पंकजा मुंडे यांच्या बोलताना विषय निघाला तर त्यांनी शिवसेनेत यावं याबाबत बोलेन. मात्र, त्या भाजपात ज्या पातळीवर काम करतात त्यावरून त्या असा काही विचार करतील असं वाटत नाही,” असं अर्जून खोतकर यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “मुंडे-महाजनांचं नाव देशाच्या राजकारणातून संपवण्यासाठी कोणाचे तरी पडद्यामागून प्रयत्न…” – संजय राऊतांनी उपस्थित केली शंका!

पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी औरंगाबादमधील भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावर अर्जून खोतकर यांनी मला याबाबत माहिती नसल्याचे सांगत हिंसेचं समर्थन कुणीही करणार नाही असं मत व्यक्त केलं. तसेच यावर अधिक बोलणं टाळलं.