सांगली : सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स दुकानातून भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून १४ कोटींचे दागिने, हिरे, जवाहिरे अज्ञातांनी लंपास केल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले असून दरोडेखोरांनी वापरलेली मोटार मिरजेपासून १७ किलोमीटर अंतरावरील भोसे यल्लंमा मंदिराजवळ सोडून देण्यात आल्याचे आढळून आले. पोलीसांच्या हाती अद्याप काहीही ठोस माहिती मिळालेली नसली तरी टोळीने मंगळवेढ्याच्या दिशेने धूम ठोकल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
रविवारी दुपारी सांगली-मिरज रस्त्यालगत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या अलंकाराच्या दुकानावर अज्ञात दरोडेखोरांनी कर्मचार्यांना बांधून लूट केली. रात्री उशिरा लूट कितीची झाली याची माहिती समोर आली असून रोकडसह १४ कोटी ६९ हजार ३०० रूपयांची लूट केली असल्याचे स्पष्ट झाले.दूरचित्रीकरणात काही दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट झाले असून टोळीने गुन्ह्यात वापरलेली मोटार (एमएच ०४ ईटी ८८९४) सोलापूर मार्गावरील भोसे गावच्या हद्दीत यल्लंमा मंदिरामागे एका शेतात बेवारस स्थितीत सोडण्यात आली असल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. मात्र, मोटारीचा नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे चौकशीत दिसून आले. या मोटारीमध्ये एक गावठी पिस्तुल, कपडे पोलीसांच्या हाती लागले असून चोरट्याचा माग घेण्यासाठी सात पथके तैनात करण्यात आली आहेत.




चोरटे मंगळवेढ्याच्या दिशेने गेले असावेत असा कयास असून त्या दिशेने तपास सुरू आहे. पोलीसांच्या हाती अद्याप काहीही ठोस हाती लागलेले नाही, मात्र, दरोडेखोरांनी रेकी करून हा प्रकार केला असल्याचे कर्मचार्यांच्या जबाबातून पुढे आले आहे. मोटारीपुढे एक दुचाकीस्वार जोडीदारासह होता अशीही काही दृष्ये चित्रित झाली असून दुकानात कशा पध्दतीने लूट केली याची चित्रफित पोलीसांच्या हाती लागली आहे.
शोध दरोडेखोरांचा, हाती लागले दारू तस्कर
दरोडेखोरांना पकडण्यासाठी सोलापूर पोलीसांनीही नाकाबंदी केली होती. यावेळी पोलीसांचा अडथळा मोडून एक मोटार भरधाव गेली असता पोलीसांनी पाठलाग केला असता मोटारीतून दारूच्या बाटल्या पोलीसांच्या दिशेने फेकण्यात आल्या. पाठलाग करून पकडले असता गोव्याहून स्वस्तातील मद्य तस्करी करणारे आयते पोलीसांच्या हाती लागले. याची कुणीतरी चित्रफित करून समाज माध्यमावर प्रसारित केल्याने दरोडेखोर हाती लागले असल्याची अफवा पसरली.