मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी भरतीला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) संवर्गातील १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरित करण्याचा विशेष समारंभ उद्या ४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता वाढविणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून गंभीर आजारांपर्यंतच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही भरती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
६७४ विशेषज्ञ आणि ७६६ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती
राज्यातील वैद्यकीय अधिकारी संवर्गातील एकूण २ हजार ५१४ पदांपैकी १ हजार ४४० पदांसाठी २७ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत ६७४ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि ७६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी अशा एकूण १ हजार ४४० पदांचा समावेश आहे. डॉक्टरांची उपलब्धता वाढल्याने स्थानिक पातळीवरच तपासणी, निदान आणि उपचार मिळण्यास मदत होईल. अपघात, प्रसूती, सर्पदंश, संसर्गजन्य आजार तसेच अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्ये वेळेवर उपचार मिळणे शक्य होईल. माता व बाल आरोग्य सेवा, नियमित आरोग्य तपासणी, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे निदान व उपचार अशा विविध सेवांना अधिक गती मिळरार आहे.
‘सुदृढ नागरिक, सक्षम आरोग्य व्यवस्था आणि प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा’ या उद्दिष्टाच्या दिशेने १ हजार ४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे नवी गती मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
