सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या तेरेखोल नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. आरोंदा-किरणपाणी खाडी परिसरात परवाना असल्याचा बनाव करून रात्रीच्या वेळी वाळू उपशाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे या परिसरातील महत्त्वाचे पूल आणि नदीकाठच्या शेतजमिनी धोक्यात आल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तेरेखोल नदी पात्रात महाराष्ट्र व गोव्याला जोडणारे किरणपाणी पूल, सातार्डा पूल आणि सातार्डा कोकण रेल्वे पूल आहेत. वाळूच्या सततच्या उपशामुळे या पुलांच्या खांबांना आणि पायाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, तरीही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
नदी पात्रातील कास, सातोसे, किरणपाणी आणि सातार्डा या गावांच्या हद्दीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. मात्र, प्रशासनाकडून अधिकृत लिलाव प्रक्रिया का राबवली जात नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासकीय यंत्रणा कोणासाठी काम करते आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. किरणपाणी परिसरात दरवर्षी जुजबी कारवाई करून बोटी जप्त केल्या जातात, मात्र काही दिवसातच पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होतो. यापूर्वी याच परिसरात वाळू माफियांकडून तहसीलदारांवर दगडफेक करण्याची घटनाही घडली होती.
सध्या गोवा राज्यातील वाळू व्यावसायिकांनी नदीतून वाळू काढून गोव्याच्या हद्दीत तिचे मोठे साठे केले आहेत. या उपशामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी नुकतीच अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करून १५ वाहने पकडली होती, मात्र आरोंदा परिसरात रात्रीच्या अंधारात अजूनही माफिया सक्रिय आहेत. या बेकायदेशीर वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी महसूल प्रशासन आता कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
