तानाजी काळे

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मानवी स्थलांतरासाठी देशोदेशीच्या सीमा बंद असल्या तरी, आसमंतातल्या विश्वात मुक्त संचार करीत हजारो मैलांचा प्रवास करून रोहित पक्ष्यांनी उजनी जलाशयावर हक्काच्या पाहुणचारासाठी आगमन झाले आहे. रोहित पक्ष्यांबरोबर अनेक स्थलांतरित पक्ष्यांनी उजनीचा पाहुणचार घेत सारीपाटाचा खेळ मांडला असून त्यांच्या शिस्तबद्ध खेळांनी मानवी मनाला उभारी देणारा विरंगुळा निर्माण झाला आहे.

करोनाच्या कडक निर्बंधांमुळे पर्यटक आणि हौशी पक्षिनिरीक्षकांच्या संचाराला बंदी असली तरी स्थानिक भूमिपुत्रांची पावले विरंगुळ्यासाठी उजनी जलाशयाकडे वळू लागली आहेत. या वर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याचा वापर कमी वापर झाला. त्यामुळे दलदलीची पाणथळी निर्माण झाली नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून रोहित पक्ष्यांना जलाशयावर येण्यास पाच महिने विलंब झाला. त्यानंतर उजनीच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याने निर्माण झालेल्या दलदली आणि पाणथळीमुळे पाहुणचारासाठी आलेले रोहित पक्षी आणि अन्य पक्ष्यांच्या अस्तित्वाने उजनी परिसर फुलला आहे.

रोहित पक्ष्यांसह शेकडोंच्या संख्येने दाखल झालेले अनेक जाती प्रजातीचे पक्षी उजनी जलाशयाला सौंदर्य बहाल करतात. मग हे सौंदर्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटक, हौशी छायाचित्रकार, पक्षिमित्र उजनीच्या तीरावर गर्दी करतात. मात्र, यावर्षी  रोहित पक्षी येण्याच्या वेळेतच निर्बंध असल्याने उजनीच्या तीरावरील निसर्गप्रेमींची वर्दळ कमी झाली आहे.

उजनीच्या अथांग जलाशयात एकाच रेषेत शेकडोंच्या संख्येने अंगावर पाणी घेत शांत वातावरणाचा भंग करीत पाणटिवळा आपले अस्तित्व दाखवितात. चमच्या पक्ष्याचे अस्तित्व चित्रपटाच्या पडद्यावर असल्यासारखे भासते. या पक्ष्यांच्या मांदियाळीत पाणकावळे, पाणतिवळा, राखी बगळे, तपकिरी डोक्याचे करकोचे हे पक्षी पाणवठ्यावर आपापली क्षेत्रे काबीज करून तळ ठोकून आहेत.

पाहुण्या पक्ष्यांच्या या मांदियाळीत कावळा, चिमणी, बगळे, साळुंकी, पोपट, होला हे स्थानिक पक्षी रानावनात भटकत असल्याचे दिसत आहे.