एजाजहुसेन मुजावर

यंदा सुरुवातीला वरुणराजाने अवकृपा केल्याने सोलापूर जिल्ह्य़ातील कोरडेठाक पडलेले बहुतांश पाणवठे, ओसाड रानमळे यामुळे दरवर्षी विदेशातून स्थलांतर करून दाखल होणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाबद्दल साशंकता होती. परंतु पावसाळ्यानंतर सार्वत्रिक बरसलेल्या धुवांधार पावसाने जिल्ह्य़ातील सर्व पाणवठे तुडुंब भरले असून माळरानेही हिरवाईने बहरली आहेत. त्यामुळे परदेशी पक्ष्यांना पोषक वातावरण निर्माण होऊन त्याचा अंदाज घेत असंख्य परदेशी पक्षी सध्या जिल्ह्य़ात दाखल होत आहेत.

सोलापूर जिल्ह्य़ात शेतशिवारातील पिकांच्या गर्दीत, गवताने आच्छादित झालेल्या माळरानावर आणि पाणवठय़ांवर युरोपियन व भारतीय नीलकंठ,  विविध फ्लाय कॅचर, पर्णवटवटय़ा, बी ईटर, धोबी, नदी सुरय, तुतूवार, मत्स्यघार, गरुड, समुद्र पक्षी (गल्स), पाणटिवळा, (गॉडविट), परी (शॉव्हलर), व सोनुला या बदकांची पहिली तुकडीही दाखल झाली आहे. विदेशी पक्षी जिल्ह्य़ात विखरून राहून पुढील तीन-चार महिन्यांच्या अधिवासासाठी बस्तान बसवत आहेत. पहिल्या लाटेत आलेले हे पक्षी सध्या एकाच ठिकाणी गर्दी न करता आपापल्या अनुकूल स्थळांची उपलब्धता पाहून विविध जलस्थाने व माळरानांवर विखुरले गेले आहेत. त्याची नोंद पक्षी व पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

स्थलांतरित पक्षी साधारणपणे तीन टप्प्यांत सोलापूर जिल्ह्य़ात येतात. ऑक्टोबरपासून काही पक्षी दाखल होतात. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत चक्रवाक, पट्टकदंब, नाकेर (नकटा), शेद्रय़ा बड्डा (पोचार्ड), काणूक (टील्स), सरग्या (पिनटेल), बटवा, ससाणे (केस्ट्रल) मत्स्य गरुड, शिखरा (हॉबी), भोवत्या, मधुबाज (मोहाळ्या बझर्ड) हे पक्षी दुसऱ्या लाटेत दाखल होतात. तर तिसऱ्या लाटेत डिसेंबरअखेर व जानेवारीत रोहित (फ्लेमिंगो), पट्टकदंब (बार हेडेड गूज), कलहंस (ग्रे लॅग गूज), चक्रवाक (ब्राह्मणी डक), चिखल बाड्डा (गार्गेनी), श्वेतबलाक, क्रौंच (डोमसाइल व सायबेरियन क्रेन्स), फॅलोरोप या पक्ष्यांचे आगमन होते.

थंडीमुळे आगमन नाही तर स्थलांतर!

हे विदेशी पक्षी सर्वसाधारणपणे युरोप, दक्षिण आफ्रिका या खंडांसह सायबेरिया, अफगाणिस्तान, हिमालय या भागातून स्थलांतर करून आपल्याकडे येतात. त्यांच्या मूळ प्रदेशात या काळात कमालीची थंडी किंवा काही ठिकाणी हिमवृष्टी होत असते. त्यामुळे तेथील पक्षिजीवन बाधित होते. त्यांना खाद्यान्नाचा तुटवडा भासू लागतो. त्यांच्या मूळ जागी पडत असलेल्या थंडीमुळे हे पक्षी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी स्थलांतर करतात. आपल्याकडील थंडीचा पक्षी येण्या-जाण्याशी संबंध नाही. हे स्थलांतरीत पक्षी निवडक जलस्थाने, माळरानांवर आपले अन्न शोधतात. पुढील तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे पक्षी पुन्हा आपल्या मूळस्थानी परततात. दरवर्षी हाच क्रम अनुभवण्यास मिळतो.

– डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक