आर्ट सर्कलच्या महोत्सवात ‘म्युझिअम ऑन व्हील्स’

२८ व २९ जानेवारी रोजी हे फिरते प्रदर्शन तेथेच दिवसभर पहायला मिळणार आहे.

आर्ट सर्कल, रत्नागिरीतर्फे आयोजित दहाव्या कला-संगीत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीकरांना ‘म्युझिअम ऑन व्हील्स’ हे फिरते वस्तुसंग्रहालय पाहण्याची अनोखी संधी प्राप्त होणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयातर्फे (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम) खास तयार करून घेण्यात आलेल्या वातानुकुलित बसमध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि देखावे मांडण्यात आले असून डिजिटल उपकरणांद्वारे त्याबाबतची माहिती दिली जाते.  येथील थिबा राजवाडय़ाच्या प्रांगणात येत्या २७ ते २९ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या दहाव्या कला-संगीत महोत्सवाच्या निमित्ताने २८ व २९ जानेवारी रोजी हे फिरते प्रदर्शन तेथेच दिवसभर पहायला मिळणार आहे.

उद्यापासून कलाजत्रा

महोत्सवानिमित्त उद्यापासून (२५ जानेवारी)  २९ जानेवारीपर्यंत राजवाडय़ातील विविध दालनांमध्ये कलाजत्राही भरवण्यात येणार असून देवरूखच्या डी-कॅड कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सिरॅमिकच्या वस्तू, बांबू काम, टेराकोटाची मातीची भांडी, पटवध्रन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, ओरिगामी कलेचे प्रात्यक्षिक, काष्ठशिल्प, मूक-बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, वारली पेंटिंग इत्यादीचा यामधे समावेश आहे.

रत्नागिरीतील हौशी छायाचित्रकारांच्या  ‘लेन्स आर्ट’ या संस्थेतर्फे शहरातील बदलते व्यवसाय, या सूत्रावर आधारित सदस्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन, हे या कलाजत्रेचे आणखी एक खास वैशिष्ट्य राहणार आहे. आंबा-मत्स्य व्यवसाय, शेतकरी, खाटिक, चहावाला, चर्मकार, नाभिक, तांबट इत्यादी व्यवसायांची छायाचित्रे त्यामध्ये पहायला मिळणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Art circle festival in ratnagiri