कोल्हाटी समाजाच्या मेळाव्यात निर्णय; राज्यभरातून पाठिंबा

लावणी ही महाराष्ट्राची लोककला, गावोगावच्या यात्रेतून पिढ्यानपिढ्या जनसामान्यांचे रंजन करत राहिलेली ही कला संगीत बारी व कला केंद्रात स्थिरावली. ग्लोबल  झालेल्या लावणीपासून आता पुढची पिढी दूर ठेवण्याचा निर्णय कोल्हाटी समाजाने घेतला आहे.

कोल्हाटी समाजातील जातपंचायत बंद करण्यात आली. आता मढी ( ता. पाथर्डी ) येथे जातपंचायत होत नसल्याने समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी समाजप्रबोधन मेळावा घेतला. मेळाव्यात यापुढे मुलीला तमाशा, संगीतबारी, कला केंद्रात नाचायला पाठवायचे नाही असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला राज्यभरात मोठा पाठिंबा मिळत आहे असे कोल्हाटी समाजातील नेते अरुण जाधव यांनी सांगितले.

कोल्हाटी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. भटक्या समाजातील कोल्हाटी समाज हा नृत्य कलेकडे वळला. गावोगावी जत्रांमध्ये कला सादर केली जात होती.संगीतबारी,तमाशा, कलाकेंद्र यामध्ये कला सादर केली जात होतं होती.पिढ्यान पिढ्या लोकरंजनांचे काम कोल्हाटी समाज करीत होता.पण आता लोकाश्रय राहिला नाही, कला म्हणून त्याकडे पाहिले जात नाही.या समाजात आता अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. असे ते म्हणाले.

कोल्हाटी समाजाने कला दिली पण आजही समाज स्विकारत नाही. सन्मान करीत नाही.पोलिसांकडून कायद्याचा धाक दाखवून छळ केला जातो. तमाशा व संगीत बारीचा कार्यक्रम जर रात्री अकरा वाजल्याच्या थोडा पुढे गेला की कलावंतांना पोलीस ठाण्यात बोलावून खटले दाखल केले जातात.अशा प्रकारचे दोनशे खटले दाखल करण्यात आले आहेत. कला केंद्रावर जर दोन गटात वाद झाले तर कलावंतांना शांतता भंग केला म्हणून नोटिसा दिल्या जातात. पोलीस संगीत बारीवर छापे टाकून कलाकारांना दोन ते तीन दिवस तुरुंगात टाकून दिले जाते. त्याची बातमी माध्यमात आली की शाळेत शिकणाऱ्या मुलाचा कोंडमारा होतो. कला केंद्रातील दोघींचा खून करण्यात आला. नृत्यांगनेचा मुलगा म्हणून हेटाळणी केल्याने एका डॉक्टरने आत्महत्या केली. असे जाधव यांचे म्हणणे आहे.

कलावंतांचे प्रश्न

नृत्य करणारया महिलांचे आरोग्याचे प्रश्न आहे. कला केंद्रावर रात्रभर जागणे, पायात दहा किलोचे घुंगरू बांधून नाचणे यामुळे मणक्याचे आजार होतात कर्करोग, मधुमेह, रक्तदाब आदी आजार वृद्धपकाळात होतात. त्यावेळी कोणी या कलाकारांकडे कोणी लक्ष देत नाही. आता शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो, या व्यवसायात पडू नये अशी इच्छा असते. त्यातून पुढच्या पिढीने बाहेर पडावे अशी त्यामागची इच्छा असते.

लावणी पळविली अन्य लोकांनी!

चौदाव्या शतकापासून लावणीचे जतन करण्यात आले.उत्तर पेशवाईत ती अधिक बहरली.आता वरात,जत्रा व यात्रेतील लावणी कला केंद्रात स्थिरावली. परदेशात गेली.पण परंपरेने कला पुढे नेणाऱ्या कलाकारांना त्याचा काही फायदा झाला नाही. लावणी ही कोल्हाटी समाजापासून इतरांनी पळविली. आज राज्यात शंभराहून अधिक लहान मोठी कलाकेंद्रे आहेत. पाच हजार कलाकार महिला तेथे पोट भरतात. पण आता तेथे नवी पिढी दिसत नाही. यापुढे आपली मुलगी कोल्हाटी समाज नाचायला पाठविणार नाही, हा एक क्रांतिकारी निर्णय आहे असे अरुण जाधव यांनी सांगितले.