मी आणि माझी कविता या दोन्ही एकच गोष्टी आहेत असं मला वाटतं. त्या निमित्ताने कवितेबाबतच मी संवाद साधते आहेत. मागची आठ ते दहा वर्षांत माझ्याकडून फारशी कविता लिहिली गेली नाही. तिच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून ती रागावली असेल. काळ खरंतर खूप झपाट्याने पुढे जातो आहे. आपल्या जगण्यात काहीच स्थिर वाटत नाही इतक्या वेगाने आपण पुढे जात आहोत असं मत यावेळी कवयित्री अरुणा ढेरे यांनी लोकसत्ता लिटफेस्टमध्ये व्यक्त केलं.
सध्या टिकाऊपणा फारच अल्पकाळाचाच असतो-अरुणा ढेरे
सध्या टिकाऊपणा हा फार अल्पकाळाचाच असतो. पूर्वी टिकाऊपणा हे एक मूल्य होतं. किती वर्षे टिकलं आहे आमचं घर, किती वर्षे टिकली आहेत आमची भांडी इथपर्यंत आपण बोलत असू. आज जास्त काळ टिकणारं लगेच आऊट ऑफ फॅशन होतं, टाकाऊ, निरोपयगी होतं. अशा वेळी माझ्या डोळ्यांसमोर काळाचा मोठा पट येतो. वाटतं की शेकडो, हजारो वर्षांमध्ये किती काय काय जन्माला आलं आणि नष्ट आलं. साहित्याबाबत म्हणजे कवितेबाबत बोलायचं तर आपआपल्या काळाचा चेहरा घेऊन कितीतरी कविता जन्माला आल्या आणि काळाच्या प्रवाहात वाहून गेल्या. पण काही तुकडे शाश्वत राहिलं. तुकारामांची गाथा राहिली अगदी तसंच. कदाचित ते आजच्या जगण्याचे संदर्भ मांडत नसेल. पण माणूसपणाच्या गाठींना ते अलगद स्पर्श करतं. जगण्याच्या धामधुमीमध्ये जे निसटलंय त्याची मूठ उघडून आपल्यापुढे धरतं. अशा काहींच्या आठवणी आपल्या मनात राहतातच. असंही अरुणा ढेरे यांनी ‘लोकसत्ता लिटफेस्ट’मध्ये म्हटलं आहे.
मागच्या २५ वर्षांतली कविता आपल्या समोर आहेच-अरुणा ढेरे
मागच्या २५ वर्षांमधली कविता तर आपल्या सगळ्यांसमोर आहेच. ती आपण वाचतो आहोत, वर्तमानातही अनेक चांगलं लिहिणारे, उत्तम लिहिणारे कवी आहेत. या उत्सवात तरुण ताजं लिहिणाऱ्या कवितांबरोबरच मी थोडसं निराळं बोलणार आहे. शांता शेळके यांची आठवण काढली गेली. खरं सांगायचं तर शांता शेळके यांच्या इतकी अफाट स्मरणशक्ती माझी नाही. त्या जगल्या ऐंशी वर्षे आणि आधीच्या १०० वर्षांच्या कविता त्यांच्या स्मरणात होती. एकदा विंदा करंदीकरांना त्या म्हणाल्या होत्या की तुमची अभिरुचीतली कविता तुम्ही संग्रहात का घेतली नाहीत? ती फारच छान होती. ते म्हणाले कुठली कविता? तर कुठल्या पानावर ती कविता आहे, बाजूला वेलबुट्टी कशी होती हे वर्णन त्यांन करुन सांगितलं होतं. मराठी वाड्मयाची १०० वर्षे त्यांच्याकडे जिवंत होती. अशी माणसं समाजात खूप दुर्मीळ असतात. पण अशी माणसं आपलं भाषिक दारिद्र्य घालवण्यासाठी ती उपयोगी असतात असं वाटतं असंही अरुणा ढेरे यांनी म्हटलं आहे.
शांता शेळकेंशी चर्चा करताना अपूर्वाईचं काहीतरी हाती लागत असे-अरुणा ढेरे
शांता शेळके पुण्यात आल्यानंतर त्यांचा आणि माझा स्नेह जुळला होता. अनेक भुपाळ्या, अभंग, लावणी, भारुड यावर आम्ही चर्चा करत असू. त्या काळात शांता शेळकेंनी अपूर्वाईचं काहीतरी धुंडाळावं तसं आम्हाला सापडत असे. मला आज त्या आठवणींपैकी दोन कवींची आठवण करुन द्यावीशी वाटते. पुन्हा नभाच्या लाल कडा हा कवी बी रघुनाथ यांचा संग्रह आम्हाला खूप आवडला होता. कित्येक कविता आम्हाला तोंडपाठ व्हायच्या. आवड पाहून तिची फुलांची, फुलात यौवन सजवायाची. आज तिच्या वाटेवर अंतर काट्यांवरती अंथरले, ते न कधी तिने ओळखले. अशी कविता लिहिणारे बी रघुनाथ होते. त्यांचं पुस्तकांवर, साहित्यावर खूप प्रेम होतं.
