उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६ खासदारांनी नुकताच शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा सुरू होती. हे ‘ऑपरेशन टायगर’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राबवण्यात आल्याचं बोललं जातं. ठाकरे सेनेतून ६ खासदार फुटल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
या सर्व घडामोडींनंतर आज (२४ जून) शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत जवळपास ३५ मिनिटे चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे ठाकरे सेनेकडून या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली? याची माहिती अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटलेल्या सहा खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कोणतं पत्र किंवा प्रस्ताव दिला? याची माहिती दिली जावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितली आहे. तसेच संविधानाचं उल्लंघन होईल असं कोणतंही पाऊल उचललं जाऊ नये आणि न्यायिक भूमिका घेतली जावी, अशी मागणी देखील ठाकरे सेनेकडून करण्यात आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी सांगितली आहे.
अरविंद सावंत काय म्हणाले?
“अनिल देसाई यांनी एक व्हीप जारी केला होता. आम्ही व्हीप जारी केल्यानंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीला ६ खासदार अनुपस्थित राहिले. त्यानंतर आम्ही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये आम्ही अशी विचारणा केली होती की आमच्या बैठकीला जे ६ खासदार गैरहजर राहिलेले आहेत, त्यांनी तुम्हाला व्यक्तिगत काही पत्र दिलं असेल तर किंवा सर्वांनी एकत्रित एखादा प्रस्ताव दिला असेल त्याची दखल घेतली जाऊ नये”, अशी माहिती अरविंद सावंत यांनी सांगितली आहे.
“जर त्या ६ खासदारांनी आणखी कोणता दावा केला असेल, तर आम्हाला ते कळवलं जावं, म्हणजे आम्हाला त्या अनुषंगाने पुढील पावलं उचलता येतील. आम्ही त्यामध्ये असंही लिहिलं होतं की जर चुकून एखादा प्रस्ताव दिला गेला असेल तर आमच्याशी आधी संवाद साधला गेला पाहिजे, चर्चा केली गेली पाहिजे. त्यानंतर निर्णय घेतला गेला पाहिजे, अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. त्यानुसार आम्हाला त्यांचं एक पत्र आलं होतं, त्यामध्ये सांगितलं होतं की आज बैठक आहे. त्या बैठकीला आम्हाला हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार मी आणि आमच्या पक्षाचे मुख्य प्रतोत अनिल देसाई आम्ही बैठकीला हजर राहिलो”, अशी माहिती अरविंद सावंत यांनी सांगितली.
“या बैठकीत आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांना सांगितलं की, व्हीप जारी केल्यानंतर आमच्या पक्षाच्या बैठकीला ६ खासदार गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांना असं निवेदन दिलं की जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काही प्रस्ताव किंवा निवेदन येत असेल, तर त्या बाबतीत आमचं म्हणणं असं आहे की, संविधानाचं उल्लंघन होईल असं कोणतंही पाऊल उचललं जाऊ नये आणि न्यायिक भूमिका घेतली जावी. असं आमचं म्हणणं आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांना सांगितलं आहे”, असं अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
