Maharashtra Karnataka Border Dispute: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना(ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद सावंत म्हणाले, “नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणण्याचा हक्क भाजपाने कायमचा गमावला आहे. इतकं नपुंसकत्व ते सतत सिद्ध करत आहेत. दिल्लीचेही तख्त सोडाच, दिल्ली पुढेही गुडघे टेकतो महाराष्ट्र माझा अशी यांची अवस्था आहे.” एबीपी माझाशी ते बोलत होते.

हेही वाचा – Maharashtra-Karnataka Border Dispute : आम्ही बेळगाव दौरा रद्द केलेला नाही, तो केवळ पुढे ढकलला आहे – शंभूराज देसाई

याचबरोबर, “हिंमत कशी होते यांची? क्रियेला प्रतिक्रिया झाली तर काय होईल? सर्वोच्च न्यायालयाकडे जर खटला प्रलंबित आहे. लोकशाहीच्या मूळावर घाव घालण्याचं काम भाजपा करत आहे. त्यांना कर्नाटक सरकारचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री बोम्मई जेव्हा स्वत: असं बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यामुळे तिथल्या अशा दिवाळखोर लोकांना अधिकच स्फुर्ती मिळते. कारण, सरकारचा आणि त्यांच्या गृहखात्याचा त्यांना प्रचंड पाठिंबा असतो, म्हणून हे एवढं धाडस करतात. त्यात त्यांनी हेदेखील पाहीलं की इकडे सगळे बोटचेपे बसलेले आहेत. या मिंध्यामुळे सध्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणखी सत्यानाश होतोय. तुम्ही जर अशा क्रिया करत असाल तर प्रतिक्रिया येतील आणि आल्यातर काय होईल, पुन्हा आसाम, मेघायलय का?” असंही सावंत यांनी म्हटलं.

हेही वाचा – “…तर सरकार चालवण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार” ; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!

याशिवाय “कुणालातरी निश्चितपणे या देशात दंगे व्हावे असं वाटतय. महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका का होत नाही? कारण, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून त्या विषयला बगल देण्यासाठी असं काहीतरी होतंय. म्हणजे असं काही घडलं की मग गेल्या निवडणुका आणि मग यांची सत्ता तशीच. हे सगळं राजकारण सत्ताकेंद्रीत आहे. स्वाभिमान गमावलेले नपुंसक लोकांचं नेतृत्व महाराष्ट्राची विल्हेवाट लावतय.” असा आरोपही अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind sawant criticizes shinde fadnavis government over stone pelting on maharashtra vehicles in belgaum msr
First published on: 06-12-2022 at 14:36 IST