उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले सहा खासदार फुटले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आम्ही कुणाला तुडवण्यासाठी नाही तर शिवसेना वाढवण्यासाठी एकत्र आलो आहोत. शिवसेना हे एक कुटुंब आहे इथे कुणीही मालक नाही. आपण सगळे कार्यकर्तेच आहोत असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींचा अर्थ काय? उद्धव ठाकरेंची पुढची वाटचाल बिकट आहे का? भाजपा या सगळ्यात कुठे आहे? या आणि अशा विविध प्रश्नांबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या विशेष व्हिडीओमध्ये विश्लेषण केलं आहे. आपण जाणून घेऊ गिरीश कुबेर यांनी काय भूमिका मांडली आहे.

गिरीश कुबेर नेमकं काय म्हणाले?

ऑपरेशन टायगर किंवा दणका हे शब्द मोठे आहेत. पण हे सगळे सरकारी यंत्रणांना घाबरुन फुटणारे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं ते लक्षात घेतलं पाहिजे की भाजपात गेलं की शांत झोप लागते. शिवाय निधी हा प्रश्न आहेच. मतदारसंघाचा विकास हा जर मुद्दा मान्य केला तर आयुष्यभर मधु लिमये, मृणाल गोरे, वाजपेयी, आडवाणी यांनी विरोधी पक्षाचंच राजकारण केलं. त्यांच्या काळामध्ये विरोधी पक्षात आहे म्हणून मतदार संघाच्या विकासात काही अडथळा आला नाही. त्यामुळे मतदार संघाचा विकास हे कारण बोगस आहे. यांचा व्यक्तिगत विकास हा यातला महत्त्वाचा भाग आहे. आता यांच्या विकासाची भीती वाटते आहे. मी ठाण्यात राहतो, ठाणेकर जीव मुठीत घेऊन राहात आहेत इतका अति विकास एकनाथ शिंदेंकडून चालला आहे. कुणी काय मिळवलं हा मुद्दा जास्त मला महत्त्वाचा वाटतो. विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपाने एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. सर्वगुणं कांचनं आश्रयंते, सगळे गुण सोन्याच्या आश्रयाला जातात तसे हे गुणवान भाजपाच्या आश्रयाला गेले आहेत, असं गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या कार्यक्रमात म्हटलं आहे.

विरोधक संपले पाहिजेत हा भाजपाचा एक कलमी कार्यक्रम-गिरीश कुबेर

विरोधक संपले पाहिजेत त्यांचं अस्तित्व राहता कामा नयेत हा भाजपाचा एक कलमी कार्यक्रम आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर जोपर्यंत ठाकरे या आडनावाला किंमत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या राजकारणाची भाजपाला गरज आहे. राजकारणात जोपर्यंत ठाकरे नाव टिकवून आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेंना टिकवून ठेवेल. भाजपाने संपूर्ण शिवसेना फोडली आहे, एकनाथ शिंदेंची शिवसेना हे भाजपासाठी काहीच आव्हान नाही. अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादी यांच्यापुढेही काहीही पर्याय नाही. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल सगळीकडे फोडाफोडी झालीये. तमिळनाडूतही ती फोडाफोडी करायला भाजपाला आवडलं असतं पण ते शक्य होत नाही अजून ही वस्तुस्थिती आहे. रामदासांचं वाक्य होतं मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा तसं विरोधक तेवढा संपवावा आणि कुठला धर्म वाढवावा हे सांगण्याची गरज नाही असंही मत गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंकडून काय चुका झाल्या?

उद्धव ठाकरेंकडून चुका झाल्यात का? असं विचारलं असता गिरीश कुबेर म्हणाले, ठाकरेंची चूक काढायची तर त्यांची अक्षम्य चूक म्हणजे मुख्यमंत्रिपदावर असताना तुमच्या नाकाखालून तुमचा पक्ष काढून घेतला जातो. यापेक्षा मोठी चूक काय असू शकते? सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा याची निष्क्रियताच दिसून आली. हा काय माझा माणूस आहे हा कुठे जाईल? इथे हाताळणी चुकली. पोलीस आहेत, यंत्रणा आहे तरीही तुम्हाला समजत नाही की असं काहीतरी घडू शकतं. सत्ता असताना जर तुमचा पक्ष टिकला नाही तर सत्ता नसताना टिकला नाही यात काही आश्चर्य नाही. असंही मत गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे. सध्या जे काही आपल्या समोर येतं आहे ते राजकारणाचं किळसवाणं, ओंगळवाणं आणि हीन स्वरुप समोर येतं आहे असंही परखड मत गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या विशेष व्हिडीओत मांडलं.