“जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही.” असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(शनिवार) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समजातर्फे ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रसंगी भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर सकल मराठा समाजाच्यावतीने ठाण्यात हा जो कार्यक्रम आयोजित होतो, या कार्यक्रमात या अगोदर देखील येण्याची संधी मिळाली. अतिशय उत्साहात ही शिवज्योत संपूर्ण ठाण्यात लोकाना दर्शनासाठी त्यांच्या दारापर्यंत जाते. ही भव्य मिरवणूक आमच्या राजाची भव्यता सांगते आणि त्यासोबतच आमचा भगवा हा आम्हाला आठवण करून देतो त्यागाची. की ज्या त्यागातून स्वराज्याची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली.आपल्या सर्वांना माहिती आहे की तो काळ असा होता, की जेव्हा देशातील अनेक राजे आणि अनेक राजवाडे हे मुगलांचं मनसबदार म्हणून घेण्यामध्ये देखील धन्यता मानत होते. एकप्रकारे अत्याचाराची मालिका या मराठी मुलखामध्ये, सामान्य माणसावर रयतेवर मुगलांच्या माध्यमातून सुरू होती. स्त्रियांच्या अब्रू लुटल्या जात होत्या, कुणालाही जगण्याचा अधिकार नव्हता आणि अक्षरशा प्रचंड हाहाकार ज्यावेळी होता. अशावेळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एका क्रांतीसुर्याने जन्म घेतला आणि त्याचं नाव आई जिजाऊंनी ठेवलं शिवराय. शिवरायांनी खऱ्या अर्थाने हा मराठी मुलूख बदलून दाखवला, हा देश बदलून दाखवला.”

तसेच, “खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल, तर १८ पगडजातीच्या १२ मावळातील सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, बार बलुतेदाराला त्या ठिकाणी एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं. की या पारतंत्र्यातून तुमची सुटका करण्यासाठी, या जुलमी शासनातून तुमची सुटका करण्यासाठी कुणी ईश्वराचा अवतार येणार नाही, तुमच्यातील ईश्वर जागृत करायचा आहे, तुमच्यातील पौरुष जागृत करायचा आहे आणि तुम्हालाच या असुरी शक्तीचा निपात करायाचा आहे. या असुरी शक्तीचा निपात करायची ताकद आणि पौरुष या सामान्य माणसात छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं आणि या पौरुषामुळेच आमचे छोट-छोटे मावळे कमी संख्येने देखील हजारो, लाखोंच्या फौजांवर त्या ठिकाणी भारी पडले.” असंही फडणवीस म्हणाले.

याचबरोबर, “जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती आहेत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही. जोपर्यंत आमच्या विचारात छत्रपती आहेत, तोपर्यंत आमचे विचार कोणी थांबवू शकत नाही. जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये छत्रपतींचं समर्पण आहे, तोपर्यंत आम्ही अन्याय करू शकत नाही आणि म्हणून शिवजयंती ही छत्रपतींना आठवण्यासाठी नाही तर त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी आहे. म्हणून मी खरोखर या ठिकाणी सकल मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आयोजित करून पुन्हा एकदा तुम्ही हा भगव्याचा जो अलख निर्माण केला आहे, हा भगव्याचा अलख पुन्हा एकदा आमच्यातील छत्रपती जागृत करेल.” असं फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As long as we have chhatrapati in our blood no one can enslave us fadnavis msr
First published on: 19-02-2022 at 11:50 IST